मीरा रोड/भार्इंदर : ‘तुझे काम करतो, पण आजच अर्ज भरायची घाई करू नकोस,’ असे जरी नेते सांगत असले तरी मीरा-भार्इंदरमधील इच्छुकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत मंगळवारी आपापले अर्ज दाखल केले. बहुतांश नेत्यांनी आपल्या विश्वासातील उमेदवांना अर्ज भरण्याची सूचना दिल्याचे कळताच प्रतिस्पर्ध्यांनीही तसाच पवित्रा घेत आपला नेत्यांवर भरोसा नसल्याचे दाखवून दिले आणि भाजपा, शिवसेना, काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांतील बंडाचा वणवा भर पावसातही पसरत गेला.काहींनी अपक्ष म्हणून आणि काहींनी एबी फॉर्मची वाट पाहात आॅनलाइन अर्ज भरून ठेवले, तर काहींनी आणखी काळजी घेत डमी अर्जही दाखल केले. ही प्रक्रिया आॅनलाइन असल्याने कोणत्या पक्षातर्फे किती जणांनी अर्ज दाखल केले याबाबत रात्री उशिरापर्यंत प्रचंड गोंधळ होता. उशिरा यादी जाहीर होईल, असे प्रत्येक पक्ष-त्यांचा नेता सांगत असला; तरी नाराजी, बंडखोरी पाहता ती जाहीर होईल की नाही हेही कुणाला सांगता येत नव्हते. बुधवारी दुपारपर्यंत अर्ज भरायचे असले, तरी अनकांनी रात्रीच अर्ज भरून आपला दावा पक्का केला.सेना-काँग्रेसचा प्रत्येकाला होकारशिवसेना, काँग्रेसमधील अनेक दिग्गजांसह बहुतांश इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरले. खूप आग्रह धरलेल्या, हट्टाला पेटलेल्या उमेदवारांना पक्षाच्या नेत्यांनीही अर्ज भरण्यास सांगून खूष केले, पण त्यांना एबी फॉर्म मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पक्ष म्हणून भरलेल्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.शिवसेनेने उमेदवारी पक्की केलेल्या आयारामांसह पक्षातील विद्यमान नगरसेवक, नेत्यांच्या विश्वासातील काही उमेदवार आणि निष्ठावंतांना एबी फॉर्मचे गुपचूप वाटप केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातून बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका प्रभागातील चार जागांसाठी पक्षातील आयारामांसह निष्ठावंतांनी अनेक अर्ज भरल्याने माघारीच्यावेळी ही नाराजी बाहेर पडेल.काँग्रेसनेच्या स्थानिक नेत्यांनीही सर्वच इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास मुभा दिली. पण त्यांची नाराजीही दोन दिवसांत बाहेर पडण्याची भीती आहे.एबी फॉर्म टाळण्याची भाजपाची खेळीभाजपा उमेदवारांची यादी मुख्यमंत्री व प्रदेश कार्यालयातून आल्यावर अनेक जागांवरुन वाद उफाळून आल्याने अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बुधवारी हती जाहीर होण्याची शक्यता आहे.उमेदवारी निश्चीत झालेल्यांचे अर्ज भरण्याचे काम सुरु असताना बंडखोरी टाळण्यासाठी काहींना थेट नकार न देता अर्ज भरायला सांगून आयत्यावेळी एबी फॉर्म न देण्याची खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.बंड वाढत असल्याने अनेकांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, तर काहींचे दुसºया प्रभागात पुर्नवसन करण्याची कसरत सुरु आहे.काय मिळते ते महत्त्वाचे!गुरूवारी ३ तारखेला छाननी आहे, त्यात किती अर्ज बाद होतात त्यावर आणि शनिवारी ५ आॅगस्टला दुपारी तीनपर्यंत माघार घ्यायची आहे. त्यावेळेपर्यंत किती बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना, पक्षाला आणि उमेदवारांना यश येते त्यावरच या लढतींचे चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी दिल्या जाणाºया रकमा, आश्वासने आणि नेत्यांचा शब्द यावरच सारी मदार आहे.लढती बहुरंगीच -भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यासोबतच मनसे, बहुजन विकास आघाडी, रिपल्बिकन पक्ष, संघर्ष समिती यांच्यासोबत छोटे पक्षही रिंगणात उतरल्याने मीरा-भार्इंदरच्या लढती बहुरंगी होतील, हे स्पष्ट आहे. त्यातही पॅनेल पद्धतीमुळे खर्चाचे प्रमाण चौपट वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम असणारे उमेदवारच तग धरतील, असे दिसते.
नेत्यांवर कोणाचाच भरोसा नाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:27 AM