भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारापुरते मेट्रोचे गाजर दाखवण्यात आले आणि आता तोंडाला पाने पुसली, अशी भावना नागरिकांची झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या मेट्रोला मान्यता दिल्यावर तिचा नकाशा आणि मार्ग उघड झाला. त्यातून फसवणूक झाल्याचे चित्रही उभे राहिले. केवळ बिल्डरांच्या भल्यासाठी मेट्रो शहराबाहेरून वळवल्याचा आरोप आता सुरू झाला आहे.राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही. त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी, यासाठी दिवा-वसई रोडदरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू झाले. पण तेथे प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीस प्राधान्य देण्यात आले. बºयाच आंदोलनांनंतर, इशाºयानंतर त्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. पण तेथील फेºयांतही लक्षणीय वाढ झालेली नाही.ठाणे- भिवंडी- कल्याण हा मेट्रोचा पाचवा टप्पा कापुरबावडी- अंजूरफाटा ते गोपाळनगर आणि पुढे कल्याणला जाईल, असे निवडणुकीच्या काळात सांगितले जात होते. आता ही मेट्रो अंजूरफाटा येथून ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर- टेमघर अशी शहराबाहेरून कल्याण जाईल. त्यामुळे भिवंडीतील रहिवाशांना तिचा काहीच उपयोग नाही. पूर्वी भिवंडी रोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा, आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे. त्यामुळे भिवंडीतील वाहतुकीची परवड कायम राहणार आहे.>भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रोचे श्रेय घेण्यावरून भाजपा-शिवसेनेत जुंपली होती. ही मेट्रो शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कसे सोडवेल, त्यातून भिवंडीत विकासाची गंगा कशी वाहील, सुलभ प्रवासाचे साधन कसे उपलब्ध होईल, ते सांगितले जात होते.
भिवंडीच्या तोंडाला नेत्यांनीच पुसली पाने, मेट्रो जाणार शहराबाहेरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:01 AM