उल्हासनगर : भाजपने शनिवारी पत्रकार परिषदेत घेऊन टेंडर घोटाळ्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यासह पी अँड झा कंपनीवर घोटाळ्याचे आरोप केल्याने, भाजप व शिवसेना नेते आमने-सामने आल्याचे चित्र आहे. आरोप करणारे भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे महापालिका बांधकाम विभागाच्या कामात २० टक्के पार्टनर असल्याची माहिती प्रेम झा यांनी देऊन भाजपच्या आरोपातील हवा काढून टाकली आहे.
उल्हासनगर महापालिकेने मूलभूत सुखसुविधाच्या ४२ कोटीच्या निधीतून गेल्या दोन महिन्यापूर्वी निविदा काढली होती. या निविदेत विविध १५८ पेक्षा जास्त विकास कामे आहेत. यामध्ये नाल्या बांधणे, पायवाट बांधणे, समाजमंदिर, तसेच दुरुस्तीचे कामे आहेत. ही कामे एकाच ठेकेदाराला न मिळता, लहान ठेकेदाराला मिळावी. अशी मागणी झाली होती. मात्र निविदेतील अटीशर्तीनुसार ही निविदा एकाच कंपनीला मिळाली. यातूनच भाजप विरुद्ध शिवसेना नेत्यांचा सामना रंगल्याचे बोलले जाते. भाजपचे अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व पी अँड झा कंपनीचे प्रमुख प्रेम झा यांच्यावर आरोप केले. या आरोपाचे खंडन पत्रकार परिषदेत शिवसेनानेते अरुण अशान व पी अँड झा कंपनीचे प्रेम झा यांनी केले आहे.
रामचंदानी २० टक्के भागीदार भाजपने पत्रकार परिषद घेऊन ज्या पी अँड झा कंपनीवर आरोप केले. त्या कंपनीचे प्रमुख प्रेम झा यांनी महापालिका बांधकाम विभागाच्या कामात भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी २० टक्के पार्टनर असल्याचे सांगून खळबळ उडून दिली. टेंडर घोटाळ्याच्या आरोपावरून भाजप वादात सापडला असून पक्षनेत्यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोल्डन गॅंग सक्रियशहरातील विकास कामात ढवळाढवळ करणारी गोल्डन गॅंग यापूर्वी चर्चेत होती. मध्यंतरी गोल्डन गॅंग बाबतची चर्चा बंद झाली. मात्र टेंडरवार वरून भाजप व शिवसेना नेते आमने-सामने आल्यावर पुन्हा गोल्डन गॅंग सक्रिय झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेखच्या भूमिकेकडे लक्ष शहरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू असून न झालेल्या कामाचे बिल निघत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख या दोन पक्ष नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.