डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावरील एका गावात राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या खाजगी सुरक्षारक्षकास बंदुकीचा बनावट परवाना बाळगल्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. उमेश सिंग (३५, रा. मूळ बिहार) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून जर्मन बनावटीचे पिस्तूल व १२ काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. कल्याण न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.उमेशकडे बंदुकीचा बनावट परवाना असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, उपनिरीक्षक, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, विलास मालशेटे आणि हरिश्चंद्र बंगारा यांनी बुधवारी रात्री गोळवली गावात सापळा रचून उमेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बारा बोअरच्या रायफलसह १२ जिवंत काडतुसे आणि २ फायर केलेल्या पुंगळ््या हस्तगत केल्या. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याच्याकडील शस्त्र परवाना बिहार सरकारचा असला तरी तो नकली असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
नेत्याच्या सुरक्षारक्षकाला अटक
By admin | Published: January 28, 2017 2:36 AM