ठाणे: कोपरी पूर्व भागात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एका खासगी ठेकेदाराच्या मदतीने ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना, जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅस पाईप लाईनमधून गळती होण्यास सुरुवात झाली. याचा फटका सुमारे ५०० ग्राहकांना बसला.
ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या गळतीची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस कर्मचाऱ्यांसह कोपरी पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. यावेळी महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी गॅस पाईपलाईनचा मुख्य वॉल्व बंद करून या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु केले.
याचदरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत कोपरीतील सुमारे ५०० पेक्षा अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा बंद केला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकांचा गॅस पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.