डोंबिवली : पहिली कसारा ते मुंबई या मार्गावर धावणारी लोकल कसारा स्थानकातून पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी सुटते. त्या लोकलची वेळ पहाटे ४ वाजता करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या स्थानक सुधारणा समितीच्या सदस्या अनिता झोपे यांनी केली. त्यावर लोकल गाड्यांचे परिचालन अधिकारी यासंदर्भात विचारविनिमय करतील आणि आगामी वेळापत्रकात जर शक्य असेल तर सदर लोकलची वेळ बदलण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना दिले.
स्थानक सुधारणा समितीच्या बैठकीत सदस्यांच्या तीन समस्या, सूचनांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कसारा मार्गावरील प्रवाशांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले. त्या मार्गावरील सदस्या झोपे म्हणाल्या की, पहाटे ३.३० वाजता नवीन कसारा लोकल सुरू करावी, ही मागणी रास्त असून आगामी काळात या मागणीस प्राधान्य देण्यात यावे. मुंबई येथून कसारा मार्गावर रात्री १० वाजून ५० मिनिटांनी व मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटणाºया दोन लोकल गाड्यांमध्ये बरेच अंतर असून त्या कालावधीत सेकंड शिफ्ट करून परतणाºया चाकरमान्यांना ताटकळावे लागते. त्यामुळे या दोन गाड्यांमध्ये एखादी नवीन लोकल रात्री ११.१५ वाजता मुंबई येथून कसारा मार्गावर सुरू करावी. ती मागणी रास्त असली तरी त्या वेळेमध्ये कल्याण-कसारा मार्गावर सुमारे १२ लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतात, असे स्पष्टीकरण रेल्वे अधिकाºयांनी दिले. त्यामुळे त्या वेळेत लोकल फेरी वाढवणे अशक्य असून त्यास रेल्वेने नकार दिला.
आसनगाव पूर्वेकडील नवीन जिना हा अतिशय गैरसोयीचा असल्यामुळे जुना पाडलेला जिना त्वरित दुरुस्त करावा. नवीन पादचारी पुलावर पूर्व दिशेला स्वयंचलित सरकते जिने व लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी झोपे यांनी केली. आसनगाव रेल्वेफाटकाजवळ अंडरपास (सबवे) बनवावा, असेही त्यांनी सुचवले. त्या मागणीवर मात्र रेल्वेच्या अभियंता विभागाशी चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि अहवालानुसार योग्यपद्धतीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाºयांनी दिल्याचे त्या म्हणाल्या.
लोकमतच्या हॅलो ठाणेमध्ये बुधवारी कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्येसंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचीही दखल रेल्वे अधिकाºयांनी घेतली असून लवकरच या मार्गावरील प्रवाशांच्या प्रमुख समस्या प्राधान्यक्रमाने मार्गी लागतील, असा आशावाद झोपे यांनी व्यक्त केला.