कल्याण : विधानसभेसाठी सोमवारी मतदान होत असून कल्याण पूर्व मतदारसंघात नियुक्त केलेले एक हजार ७३० कर्मचारी रविवारी मतदान साहित्यासह ३४६ मतदानकेंद्रांवर जीपीएस वाहनांमधून रवाना झाले.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात कल्याण पूर्वचा भाग, अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग, नेवाळीनाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील १० प्रभाग मोडतात. मतदारसंघात तीन लाख ४४ हजार ३६९ मतदार आहेत. यात २०८ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात उघडण्यात आले होते. पुरेशा जागेअभावी या मतदारसंघाचा भाग असलेल्या उल्हासनगरमधील व्हीटीसी ग्राउंडवर मतमोजणी होणार आहे.
मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँगरूमची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी पोलिंग पार्ट्या मतदानकेंद्रांवर पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना साहित्यवाटप व्हीटीसी ग्राउंडवर करण्यात आले. एखाद्या मतदारसंघात निवडणूक आखाड्यात पंधरापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक विभागाला प्रत्येक मतदानकेंद्रावर दोन मतदानयंत्रांची सोय करावी लागते. कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदानकेंद्रावर दोन बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहे. त्याप्रमाणे ईव्हीएम मशीन पुरवण्यात आले आहेत. ६६ मशीन राखीव ठेवल्या आहेत. त्याचबरोबर झोनल अधिकारी यांच्याकडे एक ईव्हीएम सोबत राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत मतदानकेंद्रावर मशीन बंद पडल्यास त्यांच्याकडीलही राखीव मशीन वापरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी दिली.
३८ क्रिटिकल मतदानकेंद्रे
पूर्व मतदारसंघात ३८ क्रिटिकल मतदानकेंद्रे आहेत. याठिकाणी केंद्रीय विभागातील निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आपले नाव मतदारयादीत शोधण्यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.