ठाणे - ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्याने तो वादाचा मुद्दा झाला होता. तसेच, या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच, महापौरांनी यात मध्यस्ती करुन या शिक्षिकेला आता ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मागील वर्षी प्रमाणे यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरुन हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडला होता. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक होती. तसेच नको त्यांना आणि नगरसेवकांच्या नातेवाईंकांनाच पुरस्कार देण्यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावल्याचेही दिसून आले. यामध्ये गुणीजन पुरस्कार हा अतिशय वादादीत ठरलेला मुद्दा होता. यंदा देखील अनेकांना याची खैरात देण्यात येणार होती. याच पुरस्कारात ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणे भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले होते. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्य देखील त्यांनी विषद केले होते. श्रोती या शिक्षिका असून वयाच्या 90 व्या वर्षी देखील बाह्यपरीक्षांची भूमिका बजावत असून, त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनी देखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु या शिक्षिकेचा समावेश देखील गुणीजन पुरस्कारात करण्यात आला होता. तसे सुरवातीला पत्रही तयार झाले होते. परंतु या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच, महापौर मीनाक्षी शिंदे यांची दखल घेत, त्यांचा योग्य तो सन्मान केला आहे. बुधवारी त्यांना ठाणे गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लीला श्रोती यांना अखेर ठाणे गौरव पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 5:38 PM