ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपा व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांना कोकणातील विविध शिक्षक संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सहा वर्षांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेतल्यामुळे शिक्षकांकडून त्यांना पसंती मिळत आहे.कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघाचे संस्थापक किसन कथोरे, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय शिक्षक परिषदेची रत्नागिरी शाखा, मुप्टा महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटना, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र राज्य कला क्र ीडा व कार्यानुभव शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाइन पद्धत, भविष्य निर्वाह निधी व सर्व्हिस बुक रेकॉर्ड आॅनलाइन, शालेय वेतनप्रणाली, पीएफ स्लिपा, थकीत वेतनबिले, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रकरणे, तुकड्यांच्या अनुदानाचा प्रश्न, पदवीधर शिक्षकांचे वेतनप्रश्न, नवीन शिक्षकभरती, शिक्षक अनुकंपा प्रकरणे आदी कामे होण्यासाठी डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते सातत्याने सरकारकडे दाद मागत होते. यंदा शालार्थ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अॅड. डावखरे यांनी तातडीने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर, सरकारने आॅनलाइन वेतन करण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे वेतन रखडलेल्या हजारो शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
डावखरे यांना कोकणातील प्रमुख संघटनांकडून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:38 AM