ठाणे : सुशोभिकरणाच्या नावावर केलेली विद्युत रोषणाई जशी माणसांसाठी मनमोहक ठरत आहे. तितकीच ती पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारची कृत्रिम विद्युत रोषणाई वृक्षासोबत त्यावर अवलंबून असलेले पशू पक्षी छोटे किटक यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसमध्ये राष्ट्रीय हरित लवाद व इतर न्यायालयांच्या निर्णयाच्या प्रती तोडून वृक्षांवरील कृत्रिम रोषणाई तत्काळ हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसे न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात सर्व संबंधित महापालिका विरुध्द खटला दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका असेल किंवा जिल्ह्यातील इतर महापालिका असतील त्यांच्या माध्यमातून दिवाळी असेल किंवा इतर सणासुदीची दिवस असतील किंवा आता देखील शहराच्या विविध भागात रस्त्यांवर वृक्षांवर विद्युत रोषणाई केली जात आहे. ठाण्यातील मुख्य हायवेवर देखील मोठ्या स्वरुपाच्या विविध रंगाच्या लाईट्स बसविण्यात आल्या आहेत. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. तसेच शहरातील तलाव, नैसर्गिक जलस्त्रोत येथेही रोषणाई होऊ लागली आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर लहान-मोठे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. या पक्ष्यांच्या दिशा चुकतात. विद्युत रोषणाईच्या दुष्परिणाम जगभरातील शास्त्रज्ञांनी अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत.
तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही याची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षांवर रोषणाई करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू असल्याचा दावा रोहीत जोशी यांनी केला आहे. महापालिकांकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने अखेर रोहीत जोशी यांनी वकिलामार्फत ठाणे, मुंबई आणि मिरा भाईंदर येथील महापालिकांना आणि राज्याच्या पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये शहरातील वृक्षांवर केलेल्या विद्युत रोषणाईची छायाचित्र, राष्ट्रीय हरित लवाद तसेच इतर न्यायालयाच्या आदेशांच्या प्रति देखील जोडण्यात आल्या आहेत. वृक्षांवरील विद्युत तारा तात्काळ हटविण्याचे आवाहन त्यांनी नोटीसद्वारे केले आहे. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याचेही त्यांनी सूचित केले आहे.