गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अंबरनाथ तालुका परिसरात ज्या बिबट्याने दहशत निर्माण केली होती, त्या बिबट्याने आता मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट परिसरात सोमवारी रात्री हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता वनविभागाने या परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसला होता. या बिबट्याने काही गावांमध्ये शेळी आणि वासरांची शिकार देखील केली होती.
शिकार केल्यानंतर बिबट्या पुन्हा जंगलात जात असल्याने वन विभागाने त्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. मात्र हा बिबट्या आता थेट मानवी वस्तीत शिरला आहे. वन विभागाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत बिबट्या मानवी वस्तीत शिरकाव करत नाही तोपर्यंत पिंजरे लावता येत नाही. आता या बिबट्याने मानवी वस्ती शिरकाव केल्याने वन विभाग सतर्क झाली आहे. बिबट्यामुळे मनुष्य हानी होऊ नये यासाठी वन विभाग आता ऑडनस इस्टेट परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती करुन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत आहे.
मंगळवारी सायंकाळी वनविभागाने त्यासंदर्भात तयारी केली, असून नेमका बिबट्याचा वावर कुठे आहे हे तपासण्याचे काम सुरू होते. सोमवारी रात्री ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट परिसरातील मंकी चौक परिसरात हा बिबट्या रस्ता ओलांडताना स्पष्ट दिसत आहे. या बिबट्याला तेथील सुरक्षारक्षकांनी पाहिले असून त्याचे लागलीच माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून हा बिबट्या त्याच परिसरात असल्याचे निदर्शनास येताच, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ऑर्डनन्स इस्टेट परिसर हा झाडाझुडपांनी व्यापला असून त्या ठिकाणी मोठी हिरवळ असल्याने याठिकाणी लपण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहेत. बिबट्याच्या ज्या ठिकाणी निदर्शनास आला आहे, त्याठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरी मधील अधिकाऱ्यांची मोठी वसाहत आहे.