मुरबाड : कल्याण - नगर महामार्गावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या करपटवाडी येथे शुक्रवारी दोन लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या शनिवारी सायंकाळी त्याच परिसरात मृतावस्थेत आढळून आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत काहीही वाच्यता न करता वनविभागाने मृत बिबट्या शवविच्छेदनासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.शुक्र वार, १५ जून रोजी नगर - कल्याण महामार्गावरील करपटवाडी येथील नरेश काळूराम भला आणि हर्षद विठ्ठल भला हे आजी सोबत जंगलात जांभळे खाण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. घाबरलेल्या मुलांनी आरडाओरडा करताच सोबत असलेल्या आजीबाई कान्हीबाई रामू भला (५५) यांनी बिबट्याला दगड मारून पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्या जागचा हलत नसल्याने आजीने कोयत्याचा आधार घेतला तर जखमी नरेश आणि हर्षद यांनी बिबट्यावर दगडांचा मारा सुरू केला आणि बिबट्याला पळवून लावले. याची माहिती वनविभागाला मिळताच वनपाल कपील पवार यांनी घटनास्थळी जाऊन जखमी मुलांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार केले.दरम्यान, करपटवाडी, फांगणे परिसरात वनविभागाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले असता त्याच परिसरात बिबट्या मृतावस्थेत असल्याचे शनिवारी आढळले. मात्र, वनविभागाने या घटनेची कोणत्याही प्रकारची कुणकुण लागू न देता मृत बिबट्याला संजय गांधी राष्टÑीय उद्यानात शवविच्छेदनासाठी नेल्याचे वृत्त असून माहिती देण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत.धाडसी मुलांचा केला सत्कारटोकावडे परिसरातील झाडघर ग्रामपंचायत हद्दीतील करपट वाडीतील नरेश आणि हरेश भला या दोन मुलांवर हल्ला करत बिबट्याने या दोघांना गंभीररित्या जखमी केले. बिबट्याच्या तावडीतून त्यांच्या आजीने त्या दोघांची सुटका केली. बिबट्याच्या तावडीतून नातवंडांना सोडवल्याबद्दल आजीचा तसेच मुलांचा देखील टोकावडे पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी टोकावडे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे आणि त्यांचे सहकारी हजर होते.
बिबट्या सापडला मृतावस्थेत; दोन मुलांना केले होते जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:54 AM