बदलापूर : बदलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेशिव भागातील बारवी नदी परिसरातील जंगलात रामगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ एका बिबट्याने वासराची शिकार केली होती. शिकार झालेले वासरू त्याच ठिकाणी ठेवत या परिसरात वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविले होते. रात्री हा बिबट्या पुन्हा त्या वासराला खाण्यासाठी आला असता कॅमेºयात तो कैद झाला. हा परिसर वन विभागात असल्याने बिबट्याचा वावर हा स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी बिबट्यासंदर्भात काय दक्षता घ्यावी याची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक येणार आहेत.
आंबेशिव हे गाव बदलापूर शहराला लागून आहे. या गावाच्या शेजारीच बारवी धरणातून सोडलेले पाणी वाहते. त्यामुळे बारवी नदी काठावर असलेल्या या गावाच्या परिसरात वनसंपदाही आहे. या नदी काठावरच रामगिरी महाराजांचा आश्रमही आहे.
या आश्रमातील वासराची बिबट्याने शिकार केली होती. या शिकारीनंतरच परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले. त्यानंतर वन विभागाने कॅमेरे बसविले असून त्यातही बिबट्या स्पष्ट दिसत आहे. सहा ते आठ वर्षाचा हा बिबट्या असून तो शिकार शोधत परिसरात आला आहे. भीमाशंकर जंगल किंवा चामटोली येथील जंगलातूनच हा शिकारीच्या शोधात आल्याचे स्पष्ट होत आहे.
बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. शिकारीसाठी त्याने गावातील व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर हल्ला करण्याचा धोका सर्वाधिक आहे. तर याच परिसरातील काही आदिवासी पाड्यात मोजकीच घरे असल्याने त्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याच्या वावर असल्याने लहान मुलांना घराबाहेरही सोडता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. बिबट्या कधी पकडला जातोय याकडे लक्ष लागले आहे.