ठाणे: मानपाडा वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानामध्ये आज सकाळी बिबट्या दिसला. 'प्रभात फेरी'साठी उद्यानात असलेली वर्दळ पाहून तो झुडपात लपला. बिबट्याची चाहूल लागताच वन कर्मचार्यांनी 'प्रभात फेरी'साठी आलेल्या पासधारकांना आणि जेष्ठ नागरिकांना उद्यानातून बाहेर काढले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या येऊरच्या जंगलात तीन वर्षांपूर्वी फुलपाखरु उद्यान विकसित करण्यात आले. या उद्यानात सकाळी ठाणेकरांची गर्दी असते. जंगलाला लागून असलेल्या या उद्यानात संजय गांधी उद्यानातील बिबट्या भक्ष्याच्या शोधात शिरला. पण निरव शांततेनंतर उद्यानात गर्दी झाली. त्यामुळे बिबट्याने झाडाझुडपात आसरा घेतला. झुडपांमध्ये दडून बसलेल्या बिबट्याने कोणावरही हल्ला करु नये म्हणून वन कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगत त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात येणार होते. मात्र बचाव पथक येण्यापूर्वीच बिबट्याने तारेच्या कुंपणावरून उडी घेत पुन्हा जंगलात धूम ठोकली.
ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात सकाळी दिसला बिबट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 11:40 AM