ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलातील पाणवठे, ओहळ, तलाव, नदी आदी १२ ठिकाणच्या पाणवठ्यांवर शनिवारी रात्री पशुपक्ष्यांची गणना वनविभागाकडून करण्यात आली. यावेळी पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी १५७ पशुपक्ष्यांमध्ये बिबट्या व गडद तपकिरी रंगाचा गरुड, सांबरांचा मुक्तसंचार आढळला.
वनविभागाच्या येऊर जंगल परिक्षेत्र विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी ही गणना केली. वैशाख पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख उजेडाचा फायदा घेऊन वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुमारे बारापेक्षा अधिक पाणवठ्याच्या ठिकाणी ही पशुपक्षी गणना केली. यामध्ये एका बिबट्यासह सांबर, लालकाळ्या तोंडाची १०७ वानरे, मुंगूस, ३७ वाटवाघुळं, राखाडीपिवळ्या रंगांची दोन मांजरं, दोन रानमांजरं आदी वन्यप्राणी व पशुपक्षी आढळून आले. एवढेच नव्हे तर मध्यम मोठा, गडद तपकिरी रंगाचा आणि गोलाकार पंख, लहान शेपटी असलेल्या एका गरुडाची नोंददेखील या पशुपक्षी गणनेत वनविभागाने केल्याचे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) राजेंद्र पवार यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले.
येऊरच्या जंगलातील पाणवठ्यांपासून काही लांब अंतरावर मंच बांधून तेथे वनअधिकारी, कर्मचारी दबा धरून बसलेले. पाणी पिण्यासाठी आलेले वन्यजीव, पशुपक्षी त्यांनी दुर्बीणीच्या साहाय्याने हेरून त्यांची नोंद घेतली. सुमारे २५ वन्यजीव, पशुपक्ष्यांची नोंद असलेल्यांपैकी १३ प्रकारचे वन्यजीव, पशुपक्षी पाणवठ्यांवर आढळून आले. उर्वरित हरीण, काळवीट यासारखे वन्यजीव यावेळी मात्र पाणवठ्यावर आढळले नसल्याचे अहवालावरून दिसते.उभारल्या होत्या मचाण : येऊरच्या या जंगलातील हुमायून बंधारा, चिखलाचे पाणी, कोंजरीचा पाणवठा, पटेल क्वारी आदी पाणवठे, तर चेणा नदीजवळील ओवळा परिसरात चांभारखोंडा, टाकाचा नाला, आंब्याचे पाणी, नागलाबंदरच्या सारजामोरी परिसरातील तलावलीचा पाणवठा, तर ससुनवघर येथील करवेलचे पाणी, कोरलाईचा व करंदीचा पाणवठा या घोडबंदर परिसरातील पाणवठा आदी १२ ठिकाणी लाकडी मचाण तयार करून त्यावर वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पाणवठ्यावर येणाºया पशुपक्ष्यांसह वन्यजीव प्राण्यांची नोंद घेतली आहे.