बदलापूर: बदलापूर जवळच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने कोंबड्या फस्त करण्याचा धडाका लावला आहे. आठवड्याभरापूर्वी गोरेगावात चार कोंबड्या फस्त केल्यानंतर आता कासगाव परिसराकडे बिबट्याने मोर्चा वळवला असून त्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.
मंगळवारी पहाटे बदलापूर- वांगणी दरम्यान असलेल्या कासगाव येथे बिबट्याने कैलास टेम्बे यांच्या घरासमोर असलेला पिंजरा तोडून त्यातील तीन कोंबड्या फस्त केल्या. या पिंजऱ्याच्या बाजूलाच टेम्बे यांच्या ४० बकऱ्या बांधलेल्या होत्या. सुदैवाने या बकऱ्या बचावल्या आहेत. यावेळी बिबट्याच्या पाऊलखुणाही उमटलेल्या आहेत. त्याआधी आठवड्याभरापूर्वी गोरेगाव येथील चार कोंबड्याही बिबट्याने फस्त केल्या होत्या. तर सुमारे १५ दिवसांपूर्वी कासगाव वाडी येथे जंगलात चरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ शिद यांच्या दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या.
अशाप्रकारे बिबट्या मानवी वस्तीत येऊन कोंबड्या, बकऱ्या फस्त करू लागल्याने स्थानिक नागरिकांत भोतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश टेम्बे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कासगाव व कासगाव वाडी परिसरात पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही फोटोंची पाहणी करीत असून नंतर याबाबत माहिती देऊ असे सांगितले. बॉक्स: चार महिन्यांपासून बिबट्यचा वावर सोमवारी (ता.१९) संध्याकाळी कासगाव येथील धर्मेंद्र फार्म हाऊसवर कामासाठी जाणाऱ्या एका तरुणाला बिबट्या दिसला होता. तर सुमारे चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे.
मे महिन्यात कासगावातील महेश टेम्बे हे रात्री उशिरा रिक्षा घेऊन येत असताना बछड्यासह एक बिबट्या त्यांच्या समोरून गेला होता,अशी माहिती राकेश टेम्बे यांनी दिली. बॉक्स: वन विभागाने लावले सूचना फलक सामाजिक कार्यकर्ते राकेश टेम्बे व विश्वदीप गायकवाड यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कासगाव व कासगाव वाडी परिसरात पाहणी केल्यानंतर या परिसरात सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्याद्वारे कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.