ठाणे : आठवड्यातून एक दिवस होत असलेली पाणीकपात कायम ठेवायची की वाढवायची, या निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा व सतत वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे धरणांमध्ये सद्य:स्थितीला सुमारे सरासरी ४५ टककयांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.सध्याची कपात कायम ठेवून वाढ मात्र होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाण्याच्या कपातीत वाढ होण्याची शक्यता आठवड्यापूर्वी नाकारली. पण, सततच्या उष्णतेच्या लाटांनी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यातून पाणीसाठा कमी होत असल्यामुळे कपात वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यास अनुसरून होऊ घातलेल्या बैठकीत पाणीकपात कायम ठेवणार की, त्यात वाढ करणार, हा निर्णय सध्या तरी एक आठवडा लांबणीवर गेला आहे.सुमारे १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आली नाही. यामुळे एक दिवसाची पाणीकपात लागू झाली. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख भातसा धरणात ४६ टक्के, तर बारवी धरणामध्ये ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सरासरी ४५ टक्क्यांपेक्षा कमी साठा धरणांमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:05 AM