ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे वैद्यकीय मनुष्यबळही कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मंगळवारपासून मुख्यालयाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू केलेल्या भरतीकडे उमेदवारांनी कोरोनाच्या भीतीपोटी अक्षरश: पाठ दाखविली. १५०० पदांची ही भरती असून तीमधून डॉक्टर,नर्स,आया, वॉर्ड बॉय भरले जाणार होते. अन्य कर्मचाऱ्यांनीदेखील याकडे पाठ फिरविल्याचेच दिसून आले आहे. त्यातही एमडी डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टरांनीही या भरती प्रक्रियेकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या माध्यमातून लेक्च रर, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद आदींसाठी ५०० जणांची भरती केली जाणार आहे. मंगळवारी या पदांसाठी काही आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी आदींसाठी बहुसंख्य डॉक्टरांनी हजेरी लावली होती. परंतु, इतर पदांसाठी उमेदवारांनी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे प्रशासनाने एमबीबीएस आणि एमडी डॉक्टरांसाठी दोन लाख ४९ हजार रुपयांचे मासिक मानधन देणार आहे. शिवाय त्यांना ५० लाखांच्या विम्याचे कवचही मिळणार आहे. आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी डॉक्टरांशिवाय इतर कोणीही हजेरी लावली नाही. नर्सेस (परिचारिका) १९५ जणांची भरती केली जाणार होती. परंतु, मुलाखतीसाठी केवळ ६५ उमेदवारांनी तर प्रसविकांच्या ११९ पदांसाठी ७७ उमेदवारांनी हजेरी लावली.
अन्य पदे ३० मेपर्यंत भरणार
बुधवारी को-सिस्टर इन्चार्ज, प्रयोगशाळा विशेषज्ञ, औषध निर्माण अधिकारी आदींच्या मुलाखती घेतल्या गेल्या. गुरुवारी वॉर्डबॉयसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच आरोग्य निरीक्षक, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटाएण्ट्री आॅपरेटर यासाठी २९ मे आणि ईसीजी आॅपरेटर, आयापदासाठी ३० मे रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
1500 पदे : उमेदवार आले कमी
कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करणे गरजेचे आहे. जितक्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, त्यासाठी कमी उमेदवार येणे ही चिंतेची बाब आहे. मात्र, या माध्यमातून आवाहन करतो की, जास्तीत जास्त उमेदवारांनी हजेरी लावून या प्रक्रियेस सहकार्य करावे. - विजय सिंघल, आयुक्त, ठाणे महापालिका