मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावात चिखलयुक्त पाणी असल्याने गणेशभक्तांनी विसर्जनासाठी या तलावांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याठिकाणी गणेश विसर्जन करणे म्हणजे साथीच्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे असल्याचे सांगत गणेशभक्तांनी नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
मुरबाड नगरपंचायतीने शास्त्रीनगर तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्या तलावात सालाबादप्रमाणे नागरिक गणेश विसर्जन करीत आहेत. मात्र नगरपंचायतीने गणेश विसर्जनामुळे तलावातील पाणी दूषित होऊ नये म्हणून शेजारीच कृत्रिम तलाव तयार केला. हा तलाव तयार करताना तांत्रिक माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता महेश देशपांडे या कर निरीक्षकांची नियुक्ती केली. या तलावासाठी खोदकाम केलेली माती ही इतरत्र न टाकता ती तेथेच ठेवल्याने पावसामुळे ती माती खड्ड्यात आली आणि संपूर्ण तलावाचे पाणी चिखलयुक्त झाले. नगरपंचायतीने याेग्य काळजी न घेतल्याने नागरिकांनी अखेर नगरपंचायतीचे नियम धाब्यावर बसवून त्यांनी सालाबादप्रमाणे मूळ तलावात गणेश विसर्जन केले. यामुळे नगरपंचायतीेचे लाखो रुपये चिखलात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.