ठाणे : सेकंड अनलॉकनंतर आता २०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडता येणार आहे. यामुळे आता विवाहाच्या चौकशीसाठी विवाहेच्छुकांचे फोन सुरू झाले असून, मंगलकार्यालयांच्या मालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
------------------------------
अटी
खुल्या प्रांगणातील / लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालय सुरू ठेवण्याची मुभा आहे. खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के; परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती, बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के व जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
-----------------------
विवाहाच्या तारखा
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात चातुर्मास असल्याने मुहूर्ताच्या तारखा नाहीत; परंतु अडचणींच्या वेळी काढीव मुहूर्त काढले जातात, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
शुभ मुहूर्तांच्या तारखा खालीलप्रमाणे
नोव्हेंबर : २०, २१, २९, ३०
डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९
-------------------------------
विवाहासाठी २०० जणांना परवानगी सरकारने दिल्याने सर्व मंगलकार्यालयांचे मालक आता मोकळा श्वास घेऊ शकत आहेत. ही खूप सकारात्मक गोष्ट घडली. याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. २०० जणांना परवानगी दिल्यानंतर मंगलकार्यालयाची चौकशी वाढली आहे. आता सर्व सुरळीत सुरू होईल, ही आशा प्रज्वलित झाली आहे.
- रोहित शाह, हॉल मालक
..............
२०० जणांना परवानगी दिल्यामुळे आनंद वाटत आहे. पुढे ही संख्या वाढू दे अशी आशा करतो. दोन वर्षांनंतर आज बरे वाटत आहे. विवाहेच्छुकांचे फोन यायला सुरुवात झाली असून, ५० टक्क्यांनी फरक पडला आहे, आता लोकांच्या मनातील भीती कमी झाली आहे.
- विनोद शिंदे, हॉल मालक
-------------------------------
२०० जणांना परवानगी मिळाल्याने लग्नाच्या ऑर्डर्स मिळतील अशी आशा आहे; परंतु अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही.
- सुशांत गावित, बँडमालक
लग्नाच्या ऑर्डर मिळतील अशी आशा असली तरी पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने लोकदेखील ऑर्डर देत नाहीत.
- संदीप ठाकूर, बँडमालक