ठाणे : भारतात जातीव्यवस्थेने ९५ टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाऊच दिले नाही. त्यांनी पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणीच्या नावाखाली देश तोडण्याचे षड्यंत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही तर संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलने करणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका. हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेलू या; अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधू या, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
ठाणे शहरात कुल जमात तंजीम, ठाणे या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा शनिवारी काढला होता. राबोडी येथून सुरू झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेंट्रल मैदानावर विसर्जित करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन आव्हाड हे बोलत होते. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला, सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये सुमारे १० हजार ठाणेकरांनी सहभाग घेतल्याचे आढळून आले.
यावेळी, कोळसे-पाटील म्हणाले, ‘समतेच्या शोधात धर्मांतरे झाली आहेत. बुद्धांनंतर समता शिकवणारा धर्म हा इस्लाम आहे, असे विवेकानंद यांनीच सांगितले आहे. मात्र, आंबेडकरवाद्यांच्या सोबत मुस्लिम न आल्यामुळेच क्र ांती झाली नाही. ते पुढे म्हणाले की, हा देश आमच्या बापाचा आहे. आम्ही सीएए व एनसीआर मानणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आनंद परांजपे यांनी, सीएए आणि एनसीआरविरोधात लढण्याची शपथ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही कधीच सहन करणार नाही. हा केवळ संविधानावरील हल्ला नाही तर भारतमातेवरील हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.