प्रज्ञा म्हात्रे -ठाणे : ‘अडाणी मी भोळी बाई कशी लिहीणार गं? चल, जाऊ आजी आईच्या शाळेला’ अशा भावना आजीबाईंनी व्यक्त केल्या. हातात आलेली पाटी पेन्सील आता सुटूच नये असं वाटतं. पाटी पेन्सील पाहून लई आनंद झाला. आयुष्यभर अडाणी राहीलो अन आता आम्हाला शिकायला मिळतंय त्यामुळे आत्मविश्वास वाढत आहे. बँकेत गेल्यावर सही म्हणून अंगठा द्यायचो ते पाहून आजूबाजूचे सुशिक्षित हसायचे. आता अंगठा देणार नाही तर आम्ही सही करणार आणि जमलं तर बॅरिस्टर पण होणार असे एकसुरात आजीबाई म्हणाल्या. संसारात गुरफटून गेलेल्या ६५ ते ८० वयोगटातील आजीबाई आता शिकू लागल्या आहेत, गणवेश घालून शाळेत येऊ लागल्या आहेत.
काही सहावारी तर काही नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन शिकत आहेत. शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे याचा प्रत्यय आजीआईच्या शाळेत येत आहेत. के. व्ही. चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाऊंडेशन यांच्यावतीने ठाणे येथील शांतीनगर येथील परिसरात ही शाळा चालवली जाते. हरेश गोगरी आणि माधुरी पाटील यांच्या संकल्पनेतून मंगळवार आणि शनिवारी दुपारी ४ ते सायं. ६ यावेळेत ही शाळा चालते. मयुरी पालन आणि भाविका सेजपाल या शिक्षिका त्यांना शिकवत आहेत. सध्या या शाळेत २० महिला शिकत आहेत तर दहा महिला या नाव नोंदवून गेल्या आहेत. मुळाक्षरे, बाराखडी, अंक यांचे लिखाण वाचन आणि स्वत:चे नाव लिहीणे, सही करणे हे आतापर्यंत या आजीबाई शिकल्या आहेत.