ठाणे : तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. तलावांचे शहर' म्हणून ओळख असलेल्या आपल्या ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ तलाव शिल्लक आहेत आणि ही या शहराची शोकांतिका आहे. तलाव संवर्धनाची माझा तलाव ही मोहीम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच ' जागतिक जलदिना निमित्त' मासुंदा तलाव (तलावपाळी) येथे ठाण्यातील सर्व तलाव आपल्या भेटीला येणार आहेत. मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' या चळवळीची सुरुवात झाली. 'या तलावांचे संवर्धन करण्यासाठी माझा तलाव ही मोहीम सुरू झाली. ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी माझा तलाव मोहिमेचा पहिला जाहीर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील मुलांचा सहभाग या मोहिमेत अग्रस्थानी आहे. आत्तापर्यंत एकूण १५ शाळांनी त्यांच्या नजीकचे तलाव दत्तक घेतले असून निरीक्षणाद्वारे मुले तलावबाबत जागरुक होत आहेत. २२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरवातीला जमलेल्या सर्व पर्यावरणप्रेमींना 'माझा तलाव' मोहिमेची माहिती देण्यात येईल. त्यानंतर शाळेतील मुलांनी तयार केलेले पोस्टर्स आणि ४२ तलावांचे फोटो यांच्यासमवेत तलावाभोवती मानवी साखळी तयार केली जाईल.
मुले आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते तलावावर येणाऱ्या लोकांना मोहिमेची माहिती देतील. 'माझा तलाव' मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांची नोंदणी सुद्धा त्याठिकाणी केली जाईल. आपल्या ठाणे शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी या मोहिमेत एक जबाबदार ठाणेकर म्हणून सहभागी होण्याचे आणि जलदिन खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळ आपल्याला करत आहे.