ठाणे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी असल्याचे सांगून भविष्यात घर घेण्यासाठी अडीच कोटींची मदत करण्याचे आमिष दाखवून पारोमिता चक्रवर्ती आणि तिची मैत्रीण स्रेहा ऊर्फ अनिता वेदपाठक या दोघींविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी ठाण्याच्या वसंत विहार येथील मानसी पंडित यांच्याकडून २९ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मानसी पंडित यांचे पती ज्योतिष आणि पत्रिका बघतात, म्हणून स्रेहाने तिच्याशी ओळख वाढवली. पारोमिता ही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी असल्याचीही बतावणी केली. भविष्यात घर घेण्यासाठी ती अडीच कोटींची मदत करेल, असेही आमिष दाखवले. परंतु, तिला आयकर विभागाच्या जाचातून सुटका करण्यासाठी २५ लाखांची गरज असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार त्यांनी दिर आणि सासूकडूनही चार लाख रुपये हातउसने घेऊन त्यांना दिले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर गिफ्ट डीड करून तशी नोटरीही या दोघींनी बनवून घेतली. पुढे पैसे परत करण्यासाठी मानसी पंडित यांनी तगादा लावल्यानंतर हन्नी फर्नांडिस आणि अख्तर या गुंडांचा धाक दाखवून धमक्या देऊन २९ लाखांची रक्कम परत करण्यास नकार दिला. अशाच प्रकारे त्यांनी रामचंद्र देसाई (६०) यांच्यासह अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०१६ ते १२ एप्रिल २०१९ या काळात हा प्रकार घडला.
मुख्यमंत्र्यांची मुलगी असल्याचे सांगून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:36 AM