ठाणे : ज्या कोविड १९ रूग्णाला बेडची गरज आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत तो मिळायलाच हवा. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करू, असे स्पष्ट करून आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे; पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी टीम म्हणून काम करू, असा विश्वास नवनियुक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांमध्ये भरला.शर्मा यांनी ठाणे बुधवारी महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच सर्व अधिकारी, उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त यांची बैठक घेऊन कोरोनाविषयीची परिस्थिती जाणून घेतली. आपण जे चांगले काम करीत आहोत ते सुरूच ठेवणार असून ज्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे त्यावर प्रभावीपणे काम करणार असल्याचे सांगितले. ज्या कोविड रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना बेड उपलब्ध करून देण्यापेक्षा ज्यांना त्याची खरी गरज आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते मिळायलाच हवे. त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे त्या प्राधान्याने निर्माण करू असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.या बैठकीस उपस्थित असलेले उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्रभाग समिती स्तरावर कशा पद्धतीने काम चालते, कोणत्या अडचणी जाणवतात याची नेमकी माहिती आयुक्तांनी यावेळी घेतली. प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य असून त्यासाठी टीम म्हणून काम करू या, असेही आयुक्त यावेळी म्हणाले. या बैठकीला विशेष अधिकारी, कोवीड १९ रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.>डॉक्टर अधिकाऱ्यांना प्राधान्य : ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील आयुक्तांच्या बदल्या करुन त्यांच्याजागी डॉक्टर असलेले आयएएस अधिकारी नेमले आहेत. कोरोनाचा संसर्ग लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी या अधिकाºयांचा उपयोग करण्याचा प्रयोग सरकारने केल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
"कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टीम म्हणून काम करू"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:24 AM