कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कल्याण पुर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामालाही आता वेग येणार आहे. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या क्ले मॉडेलच्या प्रतिकृतीस महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालय विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी नुकतेच केडीएमसीच्या बांधकाम विभागाला पाठविले आहे. पाच वर्षापुर्वी केडीएमसीच्या कल्याण पूर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत महापालिकेने ठराव मंजुर केला आहे. परंतू ठोस कृती होत नसल्याने भीम बांधवांच्या वतीने ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात डिसेंबर महिन्यात उपोषण छेडण्यात आले होते. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी या पुतळा उभारणीच्या कामासाठी ५० लाखांचा आमदार निधीही दिला आहे. विशेष बाब म्हणजे या कामाचे भुमिपुजनही झाले आहे. याठिकाणी दरवर्षी आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाणदिनी तात्पुरता बाबासाहेबांचा फायबरचा पुतळा बसवून भीम बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात येते. जोर्पयत पुर्णाकृती पुतळा बसविला जाणार नाही तोर्पयत फायबरचा पुतळा हटविणार नाही असा पवित्र त्यांनी डिसेंबर महिन्यातील उपोषणादरम्यान घेतला आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पुढाकाराने उपोषण मागे घेण्यात आले होते तसेच लवकरच हा पुतळा बसविण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते. दरम्यान आता लवकरच हा पुतळा उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. मुंबई मानखुर्द येथील शिल्पकार स्वप्नील कदम हा पुतळा साकारणार आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालयात बसविण्यात येणारा पुतळाही त्यांच्या हस्तेच साकारण्यात आला आहे. डोंबिवलीतील काम अंतिम टप्प्यात आहे. कल्याण पुर्वेकडील पुतळयाचे कामही लवकरच सुरू केले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. सहा फुट चबुत-यावर हा दहा फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. डोंबिवलीप्रमाणोच हा पुतळा असणार आहे असे ते म्हणाले.
बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मान्यता, कला संचालनालयाचे केडीएमसीला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 7:14 PM