भिवंडी - इगतपुरी तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यू नंतर नाशिक अहमदनगर भागात लहान बालकांना मेंढया राखण्यासाठी मेंढपाळांनी त्यांच्या पालकांना कवडीमोल दाम देऊन मुलांना घेऊन गेल्याचे उघड झाल्या नंतर या प्रकरणांमध्ये श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करून दोन वेठबिगार बाल कामगारांची सुटका केली असून सोमवारी पडघा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे. राहुल दिलीप पवार वय १७ व अरुण रामू वाघे वय १२ असे वेठ बिगरीतून मुक्त केलेल्या मुलांची नावे आहेत.
पडघा नजीकच्या वडवली येथील खोताचा पाडा येथील दिलीप पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील भिवा गोयकर रा.ताजु ता. कर्जत हा येऊन त्याने आपल्याकडे मेंढया राखण्यासाठी कामगाराची गरज असल्याचे सांगत त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा राहुल यास आपल्या सोबत देण्याची मागणी केली व मुलाचे लग्न पण आपण लावून देऊ असे सांगत कुटुंबियांना फक्त १५०० रुपये देऊन सोबत घेऊन गेला .मागील दीड वर्षे त्यास आपल्याकडे ठेवून त्याच्या कडून शारीरिक श्रमाची कामे करून घेत होता व त्यास कामाचे पैसे देखील न देता त्याची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केली.
तर दुसऱ्या प्रकरणात पडघा नजीकच्याच वाफाळे येथील सागपाडा येथील रामू वाघे यांच्या गावात मागील वर्षी मेंढ्या घेऊन आलेले मेंढपाळ संभाजी खताळ रा. ढवळपुरी ता पारनेर जि अहमदनगर याने आपली पत्नी नेहमी आजारी असल्याने मेंढ्या राखण्यासाठी कामगाराची गरज असून मुलगा अरुण यास महिना ५०० रुपये मोबदला देऊन आपल्या सोबत घेऊन गेले.सुमारे दीड वर्षे अरुण हा संभाजी खताळ यांच्या कडे काम करीत होता.इगतपुरी येथील घटनेच्या वाच्यते नंतर मेंढपाळाने अरुण यास त्याच्या घरी आणून सोडले.ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या जया केशव पारधी, आशा नारायण भोईर,मारुती भांगरे,संतोष भेरे यांना समजताच या वेढबिगारी म्हणून राबलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना घेऊन पडघा पोलीस ठाण्यात भिवा गोयकर व संभाजी खताळ या दोन मेंढपाळां विरोधात वेठबिगारी उच्चाटन अधिनियमासह विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटनेने अधिक आक्रमक झाली असून अशा प्रकारच्या वेठबिगरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून वेठबिगारी मुक्त मजुरांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच पडघा पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे.