ठाणे : आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, ग्रंथालये ही कालबाह्यहोऊ शकत नाहीत. केवळ त्यांनी कालानुरूप परिवर्तन करण्याची गरज आहे. जे परिवर्तन करतील, ते कालौघात टिकतील, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी विजेच्या लपंडावाने राज्यपालांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला.मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शुक्रवारी सायंकाळी गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, पुस्तके किती जण वाचतात आणि वाचनसंस्कृती रुजणार कशी, हा यक्षप्रश्न आहे. मोबाइल, इंटरनेटवर रुळलेल्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे, हे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना ग्रंथालयांनी ग्रंथव्यवहार आधुनिक पद्धतीचे आणि समृद्ध केले पाहिजे. विशेष म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटलायझेशनची प्रक्रिया हाती घेऊन आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे नाईक यावेळी म्हणाले. यावेळी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति ! या आपल्या पुस्तकाचा संच संग्रहालयाला भेट दिला.या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महाराष्टÑ राज्य ग्रंथालयांचे संचालक किरण धारोंडे तसेच संग्रहालयाचे विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, दा.कृ. सोमण, विद्याधर ठाणेकर, मा.य. गोखले उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय अॅड. वा.अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.वीजपुरवठा खंडितमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यक्र म सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आणि कार्यक्र म सुरू असताना साधारण दोनतीन मिनिटे वीज गेली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आधीच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनरेटरवरही लोड आला होता. त्यामुळे ते सुरू होऊन वीजप्रवाह सुरळीत व्हायला काही वेळ लागला, अशी माहिती रंगायतनमधील व्यवस्थापकांनी दिली.
ग्रंथालयांनी परिवर्तन करण्याची गरज - राम नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:16 AM