ठाणे : प्रत्येक गावात ग्रंथालय उभी रहायला हवीत. यासाठी योजना करायला हवी. ग्रंथालय हे मंदिर व्हायला हवीत. यामुळे ग्रंथालय चळवळीचा विकास होईल, असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रंथालय संचालक डाॅ बा ए सनान्से यांनी परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले. " ग्रंथालय संचालनालय : सुवर्ण गाथा (सन 1968 ते 2018) " या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ग्रंथोत्सव २०१८ या कार्यक्रमात सदर परिसंवाद पार पडला. ग्रंथालये टिकली पाहिजेत, ग्रंथालयांच्या अडीअडचणी समजुन घ्यायच्या असतात, त्यावर संचालनालयाने मार्ग काढालयाला हवा. ग्रंथालयाचे सभासद वाढायला हवेत यासाठी सरकारी करभरणा करताना किंवा शासकीय योजना राबविताना ग्रंथालय सभासद ओळखपत्र अनिवार्य करायला हवे,असे सांगुन सनान्से म्हणाले की ग्रंथालय चळवळीचा विकास होण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय ही योजना राबवायला हवी असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माजी ग्रंथालय उपसंचालक श ज मेढेकर यांनी सांगितले की शासन ज्याप्रमाणे उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार देते त्याप्रमाणे राज्यातील उत्कृष्ट ग्रंथालयांनाही पुरस्कार द्यावेत. तर माजी सहाय्यक ग्रंथालय संचालक बा रा हंद्राळे म्हणाले की प्रत्येक भाषेतील साहित्य प्रकाशित करुन त्याचे वितरण करायला हवे. माजी ग्रंथपाल आ म केळकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयांची गरज असल्याचे सांगितले. तर माजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रमेश शेलार यांनी शासनाने ग्रंथालयांना योग्य मार्ग दाखवावा असे आवाहन केले. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह चांगदेव काळे, अनिल ठाणेकर, महादेव गायकवाड, संजय चुंबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.