पालघर : रिअल क्राफ्ट प्रणालीअंतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या, परंतु प्रत्यक्षात मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणीच रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून एकूण ४४ नौकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्याला ७२० किलोमीटर्सचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून कोकणातील मुंबई, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. समुद्रात पर्ससीन आणि एलईडी पद्धतीने बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाºया ट्रॉलर्समुळे मत्स्य उत्पादनाची आकडेवारी घसरली असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बेकायदा चालणाºया ट्रॉलर्सविरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून करण्यात आल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी २० आॅगस्ट रोजी कारवाईचा आदेश काढला होता.जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्तांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक बंदरातील नौकांची माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शासन निर्णयानुसार मत्स्य विभागांतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या २८ हजार ७६८ इतकी असून त्यापैकी १५ हजार ६१२ नौकांनी मासेमारी परवाना घेतला आहे. तर उर्वरित १३ हजार १५६ नौकांनी मासेमारी परवाना अजूनही घेतलेला नसल्याचे मत्स्य विभागाचे म्हणणे होते. पालघरचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी उत्तनमधील ३४, तर पालघरमधून १० अशा एकूण ४४ नौकांची नोंदणी रिअल क्राफ्ट नोंदणीमधून रद्द केल्याचे सांगितले.
पालघर-ठाण्यातील ४४ नौकांचे परवाने रद्द; मासेमारीसाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:40 AM