अजित मांडके,ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
पुण्यात झालेल्या घटनेनंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरु झाली आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाईचा दट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाºया तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, ढाबे सुरू आहेत.
त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवणे अशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मद्य विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हॉटेल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.