परिस्थितीने माणसाला खूप काही शिकवले जाते. कमी शिक्षण किंवा घरात दारिद्र्य असल्याने खडतर आयुष्यच नशिबी येते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी रस्त्यावर राहण्याची तयारी ठेवावी लागते. ठाण्यात दिवाळीनिमित्ताने कंदील, पणत्या विक्रीसाठी विक्रेते येतात. या वस्तू विकून चार पैसे गाठीशी घेऊन ही मंडळी पुन्हा गावाला परततात. पण यंदा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सुरूवातीला व्यवसायावर परिणाम झाला. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर ग्राहकांनी बाजारपेठ फुलून गेली होती. त्यामुळे या विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.मुंबईत कुठलाही माणूस आली तरी तो उपाशी राहत नाही. काहीना काहीतरी काम मिळवून आपल्या पोटाची खळगी भरतो. त्यासाठी त्याची कितीही कष्ट घेण्याची तयारी असते. ठाण्यातही दिवाळीच्यावेळेस स्टेशन परिसरात कंदील, पणत्या विकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विक्रेते येतात. या विक्रेत्यांचा संसार रस्त्यावरच थाटलेला असतो. अनेक अडीअडचणी आल्यातरी त्याला सामोरे जात ते आपला व्यवसाय करत असतात. ठाणेकरांची घरे दिव्यांनी उजळून टाकणारे मात्र अंधारातच चाचपडत असतात. दुकानांची पायरी किंवा ओटा हेच त्यांचे घर होऊन जाते. दिवसभराच्या काबाडकष्टानंतर चार घास पोटात ढकलून तिथेच अंग आडवे करतात. यंदा मात्र पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने या विक्रेत्यांचा हिरमोड झाला. पावसामुळे ग्राहकच येत नव्हते. त्यात पणत्या, कंदील यांचे पावसापासून संरक्षण करताना या विक्रेत्यांची तारांबळ उडत होती.
ठाणे स्टेशन परिसरात ते ज्या पद्धतीने राहतात हे पाहून मनाला वेदना होतात. श्रीमंती आणि गरिबी यातील दरी यातून दिसून येते. यंदाही ठाण्यात महाराष्ट्रातून विक्रेते ठाण्यात आले होते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने जसे शेतकऱ्यांचे नुकसान केले तसे या विक्रेत्यांनाही पावसाचा फटका बसला. पावसामुळे कंदील प्लास्टिकने झाकून ठेवावे लागत होते. व्यवसाय झाला तर ठिक पण नाहीच झाला तर उपाशी झोपायचे एखाद्या दुकानाच्या आडोशाला, अशी या विक्रेत्यांची गत होती. छोटे छोटे कंदील काठीला लावून विकत असताना पाऊस आला तर बसस्टॉपच्या आडोशाला उभे राहायचे आणि पाऊस जाईपर्यंत वाट पाहायची. रात्र झाली की एखाद्या दुकानाच्या आडोशाला झोपायचे आणि सकाळ झाली की ग्राहकांची वाट बघत बसायचे असाच दिनक्रम सुरू असतो खेड्यापाड्यातून आलेल्या गोरगरिब विक्रेत्यांचा.सण - उत्सवाच्या काळात आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी खेड्यापाड्यातून कुुटुंब शहरात उदरनिर्वाहासाठी दरवर्षी येत असतात. गावी हाताला काम नसल्याने शहरात येऊन चार पैसे मिळतील या उद्देशाने अनेक कुटुंब सण, उत्सवाच्या काळात ठाण्यात तात्पुरते स्थलांतरीत होताना दिसतात. दिवाळीत तर पदपथापासून अगदी दुकानांच्या कडेकडेला हे कुटुंब वस्तू विकताना दिसतात. ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे त्यांचीही दिवाळी आनंदाची करण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू जशा पणती, कंदील विक्रीसाठी ही मंडळी घेऊन बसतात. या कुटुंबांची दिवाळी ही दिवाळीनंतर दिवाळी असते असे म्हणायला हरकत नाही. गावी रोजगार नसल्याने यंदा पंढरपूर, सोलापूर, जळगाव या ठिकाणाहून कुटुंबाची कुटुंब ठाण्यात आले होते. जांभळी मार्केट, संपूर्ण राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी याठिकाणी कोपºयात, पदपथावर, दुकानाच्या आडोशाला ही मंडळी विक्री करताना दिसून येतात. परंतु यंदा पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले, त्यांच्या दिवाळीच्या विक्रीवर पाणी फेरले.
टाकळी गावातून आलेले कुटुंब सांगत होते गणेशोत्सवात आम्ही फुले विकतो आणि दिवाळी आली की पणती. याच गावातून गोखले रोड येथे एका झाडाखाली बसलेले वृद्ध दाम्पत्य म्हणाले, धारावी येथून आम्ही पणत्या विकायला आणतो. गावाला थोडी शेती आहे ती करतो. येथे आलो की, आम्ही दोघे नवराबायको पणत्या घेऊन बसतो. पावसामुळे व्यवसाय झाला नाही त्यामुळे तीन दिवस उपाशी झोपावे लागले, असे त्यांनी सांगितले. दुकाने बंद झाली की आम्ही दोघेही तेथे जाऊन झोपतो आणि सकाळी दहा वाजल्यापासून पणत्या विकायला बसतो. युवराज काळे (८०) आणि चंदाबाई काळे (७०) हे दाम्पत्य टाकळी येथून आले आहेत. त्यांनी आपली व्यथा मांडली. जिल्हा परिषदेसमोरील गल्लीत दरवर्षी जळगाव-भुसावळ येथून कुटुंब बांबूच्या वस्तू विकायला येतात.
दिवाळीत ते बांबूपासून कंदील बनवतात. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून येथे आलेल्या सुमनबाई रणशिंगे सांगतात की, गावाला दुसºयाच्या शेतात १०० रुपये रोजंदारीवर शेती करतो.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीला येतो. परंतु कंदिलासाठी आणलेले बांबू काळे पडल्याने ग्राहक खरेदी करीत नसल्याची खंत त्यांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबांनी व्यक्त केली. पावसाची सर आली की सुमनबाई कंदील, बांबूच्या काठ्या एका ट्रकखाली सुरक्षित म्हणून ठेवतात. यंदा पावसानेच आमच्या पोटावर पाय दिला की काय अशी व्यथा त्यांनी मांडली. एक कंदील ८० ते १०० रुपयाला विकले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून एकही कंदील विकला गेले नसल्याचे या कुटुंबाने सांगितले.