ठाणे : जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी हे नृशंस हत्याकांड घडले होते.कल्याणमधील उंबर्डे येथील विकास वसंत पाटील (३२) यांचा ३ आॅक्टोबर २0१२ रोजी खून झाला होता. विकास पाटील यांचे काका रघुनाथ पाटील आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी काका शंकर पाटील यांच्यात घटनेच्या सात वर्षे आधीपासून जागेचा वाद होता. विकास पाटील एका दारूच्या दुकानावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. ३ आॅक्टोबर २0१२ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दुकानाचे शटर उघडत असताना आरोपी दोन वाहनांमध्ये आले. त्यांनी तलवारी, गुप्ती आणि चॉपरने विकास पाटील यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून, आरोपींनी वापरलेल्या दोन्ही गाड्या हस्तगत केल्या. खुनाच्यावेळी आरोपींनी घातलेले कपडेही पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत केले.कल्याण सत्र न्यायालयात न्या. एन.एम. वाघमारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगिता फड यांनी एकूण २१ साक्षीदार तपासले. या घटनेचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. याशिवाय विकास यांची पत्नी किशोरी यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम विशद केला. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कल्याण येथील खून प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 7:54 PM
कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी जागेच्या वादातून झालेल्या नृशंस हत्याकांडातील १६ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वीची घटनाजागेच्या वादातून झाला होता खूनकल्याण सत्र न्यायालयाचा निकाल