ठाणे: मेव्हण्याने घेतलेल्या पैशांवरुन झालेल्या वादातून विमल माळी या ४८ वर्षीय पत्नीचा खून करणाºया हिरालाल माळी (५६) या पतीला सश्रम कारावासाच्या जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी बुधवारी ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आपल्या भावाकडून उसनवारीने घेतलेले पैसे गावची जमीन विकून दिवाळीच्या आत परत करा, अशी मागणी विमल हिने तिचा पती हिरालाल याच्याकडे केली होती. यातून गुडीपाडव्याच्या आत हे पैसे परत करतो, असे सांगून पत्नीची हिरालालने समजूत घातली होती. मात्र, तरीही ती जोरजोरात भांडत असल्याने रागाच्या भरात हिरालाल याने लोखंडी सळईने पत्नीच्या
डोक्यात दोन ते तीन फटके मारले. यात ती जमिनीवर पडल्यानंतर उशिने तिच्या तोंडावर दाब देऊन तिचा खून केला. त्यानंतर घराबाहेर पडून मुलगा रोहित आणि पोलिसांना हिरालालने ही माहिती दिली. ही घटना १३ आॅक्टोबर २०१५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी हिरालाल याला अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात ७ डिसेंबर २०२२ रोजी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी १५ साक्षीदार पडताळून आरोपीला शिक्षा होण्यासाठी बाजू मांडली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांनी तपासी अधिकारी तर पैरवी अधिकारी म्हणून करुणा वाघमारे यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपी हिरालाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.