बदलापूर: बदलापूर नगरपालिका हद्दीत असलेल्या दोन खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने तिथल्या रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना आहे त्या परिस्थितीत इतर रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता बदलापुरात निर्माण झाली आहे.
शुक्रवारी दुपारपासून बदलापूरातील खासगी कोविड रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सीने पाठ फिरवल्याने या खाजगी रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याची बाब समोर आली आहे. बदलापूरातील दोन मोठ्या खासगी रुग्णालयात 50 ते 60 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 25 ते 30 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने या दोन्ही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयात ऑक्सीजन वर असलेल्या रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात संबंधित रुग्णालय प्रशासन मात्र कोणतीही जबाबदारी घेताना दिसत नाही. तर दुसरीकडे अचानक डॉक्टरांनी रुग्णाला हलविण्यास सांगितल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच ऑक्सिजन बेड इतरत्र उपलब्ध होत नसल्याने नेमके रुग्णांना न्यावे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शुक्रवारी दुपारनंतर ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलविण्याचा सल्ला दिल्याने लागलीच कोणत्याच रुग्णाला बॅड उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे,तर जे रुग्ण हाई फ्लो ऑक्सिजन'वर आहेत त्यांना खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेण्याची वेळ येत आहे. या रुग्णालयातील काही रुग्णांना पालिकेच्या गौरी हॉलमधील ऑक्सीजन कक्षात हलविण्यात आले आहे. मात्र इतर रुग्णांचे हाल कायम राहिले असून त्यांची जबाबदारी अधिकारी घेत नसल्याचे समोर आले आहे.