- सदानंद नाईक उल्हासनगर : बेवस चौकातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काही तासापासून अडकलेल्या मांजरीच्या पिल्याची महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी दुपारी सुटका केली. मांजरीच्या पिल्याची सुटका केल्यावर जवानांवर सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
महापालिका अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला शनिवारी दुपारी १ वाजता संदीप कला नावाच्या इसमाने फोन करून, बेवस चौकातील संत पहुरा अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाहेरील सज्जावर एक मांजरीचे पिल्लू अडकलेले. असे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन गाडीसह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी इमारतीची पाहणी करून काही तासापासून अडकलेल्या मांजरीच्या पिल्याला काढण्याचा निर्णय घेतला. रोशन अगाज या लिडिंग फायरमनने स्वतःचा जीव धोक्यात घालून हर्णेसचा वापर करून दोरीच्या सहाय्याने इमारतीच्या बाहेरील पडदीवर गेले. मांजरीच्या पिलाला अलगत उचलून बाहेर रेस्क्यू केले. मांजरीचे पिल्लू व अग्निशमन दलाचा जवान चौथ्या माळ्यावरून खाली पडन इजा होऊ नये म्हणून, नागरिकांच्या मदतीने जम्पिंग सीट पकडण्यात आली होती.
महापालिका अग्निशमन दलाचे मुख्य अग्नीशमन अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी विभागाचे स्थानक अधिकारी संदीप असेकर, सुरेश बोंबे तसेच सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र राजम, अविनाश नंदनवार यांच्यासह अन्य अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले.