ठाणे: क्रिकेट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील सुनील तुंबाड (२०) या तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. निशिकांत रोकडे व सहकारी डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करुन जीवदान दिले.गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयात ठाणे, पालघर आणि आजूबाजूच्या जिल्हयातील गरीब रुग्ण उपचाराकरिता येतात. रविवारी, १४ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात राहणाºया सुनील या आदिवासी तरुणाला गंभीर अवस्थेत उपचाराकरिता दाखल केले.सुनील क्रिकेट खेळताना, खड्डयात पडल्याने त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या स्वादुपिंडाला मार लागल्याने त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला होता. सुनीलच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी. सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निशीकांत रोक डे यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तपासण्या झाल्यावर सोमवार, १५ जानेवारी रोजी पहाटे सुनीलवर शस्त्रक्रिया केली. तब्बल अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सुनीलच्या पोटातून दीड लीटर रक्त तसेच स्वादूपिंडातून रक्तस्त्राव होणारा काही भाग यशस्वीरित्या काढण्यात आला. सुनीलला तीन बाटल्या रक्त देण्यात आले.ही यशस्वी शस्त्रक्रिया करताना डॉ. रोकडे यांना भूलतज्ज्ञ डॉ.रु पाली यादव,परिचारिका कृपा घोडविंदे, मदतनीस मिलिंद दौंडे व जावेद शेख यांचे सहकार्य लाभले.
वाड्यातील आदिवासी तरुणाला ठाणे रुग्णालयाचे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:13 AM