कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील वाडेघर परिसरात राहणाऱ्या श्लोक कृष्णा मल्ला या सातवर्षीय मुलाचा एएनईसी (अक्यूट नेक्रोटाइझिंग इन्सेफाल्टीस) या मेंदूज्वराने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. बिहारमध्ये चमकी बुखारने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. श्लोकचा मृत्यू ज्या मेंदूज्वराने झाला आहे, त्यात चमकी बुखारसारखीच लक्षणे दिसून आली आहेत. यापूर्वी आणखी एका चारवर्षीय मुलीचा याच प्रकारच्या मेंदूज्वराने याच रुग्णालयात मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये जीवघेण्या चमकी बुखारने शिरकाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
श्लोकचे वडील कृष्णा हे ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात ते राहतात. त्यांचा मुलगा श्लोक हा कोनगावच्या इंग्रजी शाळेत शिकत होता. २२ जुलै रोजी श्लोकला ताप आल्याने त्यांनी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला तपासून औषध दिले. मात्र, त्याचा ताप काही कमी होत नसल्याने, त्याला २३ जुलै रोजी पुन्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. २४ जुलै रोजी श्लोकची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मेंदूत ताप गेल्याने त्याला उलटी झाली. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
एएनसीई या प्रकारच्या मेंदूज्वराने श्लोकचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, याच रुग्णालयात याच प्रकारच्या मेंदूज्वराने बाधित झालेल्या चार वर्षांच्या तनुजा सावंतला तिच्या पालकांनी उपचारासाठी आणले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वैद्यकीय चाचण्या करण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी सांगितले की, श्लोकचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले आहे. ते अंतिम तपासणीकरिता पुणे येथे पाठवले जातील. त्यानंतर, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. श्लोक राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. त्याठिकाणी तापाचे रुग्ण किती आहेत, या आजाराची लागण अन्य कोणाला झाली आहे का, याची माहिती घेऊन उपाययोजना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर वानखेडे यांनी सांगितले की, चमकी बुखार कल्याणात येऊन ठेपला. त्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला, तरी महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.