अनिकेत घमंडी, डोंबिवलीदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, शिक्षण व अन्य कारणांमुळे अन्य भागांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोंढ्यांमुळे येथील सेवासुविधांवर ताण येत आहे. त्याचबरोबर लोकलमधील वाढती गर्दी हा त्याचा परिणाम आहे. डोंबिवलीतील रहिवासी असलेली चार्मी पासद ही याच लोकलमधील गर्दीची बळी ठरली आहे. बुलेट ट्रेन आणण्यासाठी धडपड करणाºया केंद्र सरकारने विशेषत: रेल्वे मंत्रालयाने आधी पाचवा-सहावा मार्ग सुरू करणे, पुरेशा लोकलफेºया, महिला विशेष गाड्यांची संख्या वाढवणे, यावर भर देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांमध्ये दोन लाखांहून अधिक प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून घुसमटत प्रवास करावा लागत आहे. डोंबिवली, ठाणे कल्याण आदी स्थानकांदरम्यान गर्दीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने साहजिकच अपघातांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. गर्दी नियंत्रणाबरोबरच सुकर प्रवासासाठी वाढीव फेºया व सोयीसुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासनाला फारसे यश आलेले नाही. पाचवी-सहावी मार्गिका, यावर मात्रा ठरेलच, असे नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलिव्हेटेड रेल्वेचा प्रस्ताव तेव्हा केंद्र सरकारकडून मंजूर करून आणला होता. तशा सक्षम उपाययोजना करणे आता अत्यावश्यक आहे. डबल डेकर गाड्या हा देखील गर्दीवर एक पर्याय होऊ शकतो.
मध्य रेल्वेच्या दिवसाला एक हजार ७७४ लोकलफेºया होतात, तर १५० हून अधिक लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतात. या सगळ्यांमधून ४४ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यामुळे तिकीट, मासिक पासच्या माध्यमातून कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळते. गर्दीच्या वेळेत सर्वसाधारणपणे कल्याण ते मुंबई मार्गावर तीन मिनिटांना एक लोकल सध्या धावत आहे. जलद मार्गावर ते प्रमाण पाच मिनिटांना एक लोकल असे असेलही, पण यापेक्षा लोकलफेऱ्यांमध्ये वाढ होईल, याची अपेक्षा करताच येणार नाही, हे मध्य रेल्वेने १४ डिसेंबरपासून अमलात आणलेल्या नवीन वेळापत्रकावरून स्पष्ट होते.नवीन वेळापत्रकात ठाणे जिल्ह्यातील २० लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा मिळालेला नाही. याउलट, मनस्ताप वाढला आहे. एकीकडे प्रवाशांच्या वेळेत लोकलसेवा देण्याची इच्छा असूनही रेल्वेला त्याची पूर्तता करता येत नाही, हे देखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला लागेल. पाचवा-सहावा मार्ग झाला तरीही कर्जत, कसारा मार्गावर तसेच ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर जलद लोकल कधी धावणार? तिसरा रेल्वेमार्ग कधी मार्गी लागणार? असे सवाल प्रवासी करत आहेत. विविध प्रकल्पांच्या घोषणा जरी झाल्या, तरीही त्यांची पूर्तता वेळेत होणे अत्यावश्यक आहे.एमयूटीपी फेज-२ ची कामे अजून झालेली नाहीत, त्यामुळे त्या पुढील घोषणांचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. पाचवा-सहावा मार्ग हा सुमारे १० वर्षे रेंगाळला आहे. वास्तविक, तो २०१४ च्या सुमारास पूर्णत्वास जायला हवा होता. त्यामुळे आता तो होऊनही उपयोग नाही. त्या प्रकल्पाला अपेक्षित असलेली गर्दी मुळातच वाढली असून प्रकल्प कासवगतीने पुढे जात असून भविष्यात खूप मोठे संकट रेल्वेवर येणार आहे, ही त्याची नांदी असल्याचे जाणकार सांगतात.एकीकडे खाडी बुजवून रेल्वेमार्ग तयार केला जात आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ तर सोडाच प्रत्येक पावसाळ्यात रेल्वेसेवा बहुतांश मोठ्या पावसामुळे ठप्प होते. त्यातच, रेल्वे हद्दीतील बेकायदा बांधकामे हा मोठा पेच आहे. रेल्वेला समांतर रस्त्याचा पर्याय अपेक्षित आहे, पण त्याची कुठेही पूर्तता नाही. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून येतो. अशा एक ना अनेक समस्यांमुळे प्रवाशांना सुविधा मिळणे अशक्यप्राय झाले आहे. परिणामी, आहे त्या सेवेवर प्रचंड ताण आला असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते कमी करण्यासाठी लोंढ्यांनादेखील आळा बसायला हवा.नोकरीच्या ठिकाणी वेळा बदलणे, हा एक पर्याय आहे. तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये ठाणे जिल्ह्यामधील कर्जत, कसारा मार्गांवर स्थलांतरित करणे, हा एक पर्याय आहे. सकाळच्या वेळेत मुंबईकडे जायला आणि सायंकाळी डाउनकडे कल्याणच्या दिशेने जायला गर्दी असते. त्यामुळे या वेळांमध्ये अन्य मार्गावर लोकल तुलनेने रिकाम्या धावतात.याचा विचार करून कार्यालयांचे स्थलांतर होणे, ही काळाची गरज आहे. शासकीय कर्मचाºयांची वेळ, खासगी कार्यालयांची वेळ तसेच शाळा, महाविद्यालये यांच्या वेळा यामध्ये सुमारे तासाभराचे अंतर असेल, तर गर्दीवर बहुतांश प्रमाणात नियंत्रण होऊ शकते. सर्वसाधारणपणे सकाळी ६ ते सकाळी ११ आणि दुपारच्या वेळेत २ ते ३ यावेळेत गाड्यांना मुंबईकडे जायला प्रचंड गर्दी असते. यामुळे सकाळच्या वेळेतील कामावरच्या वेळा बदलून बघायला हव्यात. प्रायोगिक तत्त्वावर हे उपाय व्हायला हवेत.महिलांचा विचार झाला तर त्यांच्या डब्यांमध्ये वाढ व्हायला हवी, याला दुमत नाही. तसेच लेडिज स्पेशल तासाभराच्या कालावधीत गर्दीच्या वेळेत दोन्ही दिशांवर हव्यात. तसेच महिलांनीही सहप्रवाशांना समजून घेत प्रवास केल्यास अपघातांचे प्रमाण घटू शकते. यासोबतच प्रवाशांनीही गर्दी असली, तरीही जीवाला जपावे. जीवावर उदार होऊन प्रवास करू नये. दरवाजात लटकून प्रवास करणे गुन्हा तर आहेच, पण यामुळे त्यांचाच अपघात होऊ शकतो, हे देखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नियमांचे पालन करत प्रवास करावा. सुविधा मिळवणे हा हक्क असला तरीही त्यासाठी जीव धोक्यात टाकू नये, हेच म्हणणे योग्य आहे.मध्य व पश्चिम रेल्वेमार्गांवरील विविध स्थानकांमध्ये गेल्या ११ महिन्यांत लोकलमधून पडून झालेल्या अपघातांमध्ये ५५६ प्रवासी मृत्युमुखी पडले तर, एक हजार २६९ प्रवासी जखमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याशिवाय, रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावणाºयांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन आता डेथलाइन झाली आहे. वाढते अपघात रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सर्वच रेल्वेस्थानकांमधील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या गर्दीच्या रेट्याचे वेळीच नियोजन करणे अत्यावश्यक आहे.