ठाणे: मद्य प्राशन करुन दुचाकी चालविणा-यांना अडविल्यानंतर कारवाईची अनामत रक्कम देण्याच्या वादातून वागळे इस्टेट वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार नवनाथ थोरवे यांनाच मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास बाळू येनकुरे, रामभाऊ येनकुरे आणि सुनिल रोकडे या तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शहरभरातील अशा ६५६ तळीरामांकडून ९ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.होली आणि धुलीवंदन या सणांच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करुन वाहने चालविणा-यांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरभर कारवाईची मोहीम सुरु होती. वागळे इस्टेट वाहतूक युनिटच्या वतीने थोरवे यांच्यासह त्यांचे सहकारी उपवन परिसरातील येऊरच्या प्रवेशद्वारावर २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही तपासणी करीत होते. त्याचवेळी बाबू येनकुरे आणि त्याचा मित्र दिपक रोकडे हे मद्यप्राशन करुन दुचाकी चालवितांना त्यांना आढळले. त्यांच्याविरुद्ध मोटर वाहन कायद्याच्या १८५, १८८ नुसार कार्यवाही करण्यात आली. तेंव्हा दोघांकडेही दंडाची अनामत रक्कम भरण्यासाठीची रक्कम नसल्यामुळे त्यांची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. याचाच राग आल्याने बाळू, रामभाऊ आणि सुनिल या तिघांनी थोरवे यांना शिवीगाळ करीत ‘ माझी गाडी अडवून ठेवतो, तुला बघतो, तुम्ही येथे कशी नोकरी करता तेच बघतो,’ अशा भाषेत त्यांना धमकी दिली. त्यानंतर थोरवे आणि त्यांच्या सहकाºयांना त्यांनी मारहाण करुन त्यांचा सरकारी गणवेश फाडून नुकसान केले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याबाबतचा गुन्हा थोरवे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर तिघांनाही ३ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सागर भापकर हे अधिक तपास करीत आहेत....................................६५६ तळीरामांकडून ९ लाखांचा दंड वसूलदरम्यान, ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाणे, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगरातील १८ युनिट अंतर्गत संपूर्ण आयुक्तालयातील मुख्य चौकांमध्ये अशा ६५६ तळीरामांवर गेल्या दोन दिवसांमध्ये कारवाई केली. त्यांच्याकडून आठ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मद्यपी दुचाकीस्वारांची ठाण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांना मारहाण: तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 9:48 PM
मद्यपी वाहन चालविणा-यांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला असतांनाच तिघा मद्यपींनी मात्र ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या उक्तीप्रमाणे येऊरजवळ दोन पोलिसांनाच मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्दे बेदम मारहाण करुन वर्दीही फाडलीदंडाची अनामत रक्कम भरण्यावरुन झाला वाद६५६ तळीरामांकडून ९ लाखांचा दंड वसूल