ठाणे, उल्हासनगर : ठाणे आणि उल्हासनगरच्या मतदानातही दिवसभर गाजला, तो मतदारयाद्यांतील घोळ. दोन दिवस अगोदर जाहीर झालेल्या यादीनंतर एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जाणे, केंद्र चुकणे, एकाच कुटुंबातील नावे विभागली जाणे असे प्रकार घडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आणि प्रशासनावर या घोळाचे खापर फोडले. मतदान केंद्र शोधण्यासाठी अॅपचाही फारसा उपयोग झाला नाही किंवा वेबसाईटचाही फायदा झाला नाही. अखेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत घेत एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातूनही काहींनी नेटाने मतदान केले, तर काहींनी काढता पाय घेतल्याने दोन्ही शहरातील मतदानाच्या टक्केवारीत फारशी भर पडली नाही.महापालिकेने रविवारी तिसऱ्यांदा मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. त्या पाहणे शक्य न झाल्याने विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कोऱ्या स्लीप हाती घेऊन येणाऱ्या मतदाराला मार्गदर्शन करून त्याचे नाव यादीत सापडलेच तर ते त्या कोऱ्या स्लिपवर टाकले जात होते. असे जरी असले तरी मतदान केंद्रावरदेखील या मतदात्याला नाव नसल्याचे समजातच त्याची दुसऱ्या मतदान केंद्रावर धाव सुरु असल्याचे चित्र होते. काहींना कामावर जायचे असल्याने त्यांचीच अधिक धावपळ झाल्याचे चित्र होते. त्यामुळे काहींना मतदान केंद्र सापडत नसल्याने त्यांनी मतदान न करताच कामावर जाण्याचा निर्णय घेतला. काही स्लिपांमध्ये अमुक एक शाळा तर काही स्लिपांमध्ये दुसरीच शाळा आणि आता तिसऱ्यांदा प्रसिद्ध झालेल्या यादीत आणखी नवे मतदान केंद्र दाखविण्यात आले आहे. त्यामुळे मतदार प्रचंड गोंधळलेले होते. त्यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करायला जायचे असा पेच त्यांच्यापुढे होता. हा प्रकार कळवा, घोडबंदर, वागळे, किसननगर, आदींसह इतर बऱ्याच ठिकाणी झाला. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचे सहकार्य मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. चार पॅनलचा एक वॉर्ड असल्याने सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी दोन ते तीन मिनिटांचा कालावधी गेला.परंतु, मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मतदाराला कशापद्धतीने मतदान करावे याची माहिती दिल्याने काहीसा दिलासा मतदारांना झाला. तर व्होटिंग मशिनवर एक बटन दाबल्यानंतर आवाज येत नसल्याने मतदारराजा काहीसा संभ्रमीत असल्याचे दिसून आले. चवथे बटन दाबल्यावरच हा आवाज येत होता. त्यामुळे मत देण्यासाठी गेलला मतदार फार वेळ घेतांना दिसत होता. छेडखानीच्या आरोपाखाली सेनेच्या शाखा प्रमुखाला नोटीसछेडछाडीच्या आरोपाखाली शिवसेनेचा नौपाड्यातील शाखाप्रमुख चंद्रकांत टेम्बे याला मंगळवारी नौपाडा पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याला लवकरच अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.काही दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यातच मंगळवारी पाचपाखाडी येथील सरस्वती शाळेजवळील एका मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचा लोगो असलेली त्याची मोटारसायकल पोलिसांना मिळाली. ही मोटारसायकल त्याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचवेळी त्याला २४ फेब्रुवारी रोजी याबाबत आपले म्हणणे मांडण्याबाबतची नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकमान्यनगरात बोगस मतदार लोकमान्यनगर भागात बोगस मतदानासाठी आलेल्या तिघा २० ते २५ वर्षीय वयोगटातील तरुणांना वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.लोकमान्यनगर येथील एका मतदान केंद्रावर हे तिघेजण मतदानासाठी आले होते. मात्र, त्यांच्याबद्दल शंका आल्यामुळे स्थानिकांनी त्यांच्या कागदपत्रांची विचारपूस केली. तेंव्हा त्यांच्याकडे अधिकृत कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडे त्यांना सोपविण्यात आले. त्यांनी बोगस मतदानही केले नसल्यामुळे तसेच भरारी पथकाकडून त्यांची चौकशी सुरु असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आणखी दोघांना लोकमान्यनगर भागात अशाच प्रकारे पकडण्यात आले होते. मात्र, त्यांची नावे मतदारयादीत असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रोनचीही नजरठाणे महापालिका हद्दीत १७०४ मतदार केंद्र होती. त्यातील ९७ मतदान केंद्र ही संवेदनशील असल्याने या मतदान केंद्रावर एसआरपीएफ, पोलीस आदींच्या मदतीला ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती.येथील प्रत्येक बारीक सारीक घटना या कॅमेऱ्याद्वारे टिपल्या जात होत्या. ठाण्यात ८ ड्रोन कॅमेरे ९७ ठिकाणी त्याचबरोबर ठाण्यात ९१ ठिकाणी फ्लॅश पॉइंट तयार करण्यात आले होते. मतदानाच्या दिवशी तक्रार आल्यास पोलीस अवघ्या तीन मिनिटांत पोहोचतील, अशी व्यवस्था केली होती. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष तपास पथक स्थापन केले आहे. तसेच सुमारे ८ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. केंद्राबाहेर उमेदवारांची कुंडलीमतदान केंद्रावर प्रवेश करताच, त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराची कुंडली असलेले फलक लावण्यात आले होते. यामध्ये त्याची मालमत्ता कीती, त्याच्यावर गुन्हे किती आहेत, आदींसह इतर महत्त्वाची माहिती तीही नावासह प्रसिद्ध केली होती. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी अनेक सुजाण मतदारांनी या याद्या बघून पुढे मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. उल्हासनगरमध्येही घोळउल्हासनगर : शहरातील गायकवाडपाडा, कैलास कॉलणी, तानाजीनगर, सुभाषटेकडी परिसर, लालचक्की, प्रेमनगर टेकडी, दहाचाळ, साईबाबानगर, खेमानी परिसर, बाल्कणजी बारी, डम्पिंग ग्राऊंड परिसर, शहाड गावठाण, सी ब्लॉक, शांतीनगर, हिराघाट, करोतीयानगर, संजय गांधीनगर परिसरात काही काळ चांगला प्रतिसाद होता. नागरिक स्वत:हून मतदान करण्यासाठी बाहेर पडत होते. श्रीमंत व मध्यमवर्गीय परिसरातील नागरिकांत मतदानाबाबत निरूत्साह असल्याचे चित्र होते. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. माफक घटना वगळता निवडणुकीला गालबोट लागले नाही. टक्का वाढविण्यासाठी फंडा : महापालिका आयुक्तांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केली. मतदान जनजागृती अभियान राबवून मतदान केल्याचा सेल्फी फाटो पाठविल्यास १०० जणांना २५ टक्के मालमत्ता करात सूट, हॉटेलच्या बिलात २० टक्के सूट तर रिक्षा चालकांनी भाड्यात २० टक्के सवलत दिली. तसेच त्यांनी व्यापारी संघटनेसह विविध राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदानाचे महत्व पटवून दिले.दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंदठाणे महापालिकेत अनेक दिग्गज हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्या सर्वांचेच भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर, एच. एस. पाटील, सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, मिलींद पाटणकर, विलास सामंत, संजय वाघुले, रामभाऊ तायडे, अशोक वैती, मिलींद पाटील, मुकुंद केणी आदींसह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, संजय केळकर, खासदार राजन विचारे, कपिल पाटील, देवराम भोईर, एच. एस. पाटील आदी घराण्यांचेही भवितव्यही मतदार ठरविणार आहेत. याद्यांच्या घोळाला प्रशासन जबाबदारशेवटच्या क्षणी याद्या बदलण्यात आल्या. त्यातून मतदारांचा घोळ झाला. त्यांना केंद्र शोधत फिरावे लागले. या घोळाला प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप विविध राजकीय पक्षाचे नेते-पदाधिकाऱ्यांनी केला.प्रशासन जबाबदारआम्हाला निवडणूक प्रक्रियेवर संपूर्ण विश्वास आहे, परंतु,असे असले तरी अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले असून काही ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ सुरुच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याला जबाबदार हे प्रशासनच आहे.- रामभाऊ तायडे, रिपाइं आठवले गट शहर अध्यक्षअधिकाऱ्यांची चूक निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मतदार यादीमध्ये अनेक ठिकाणी घोळ झाले. त्यामुळे याचे परिणाम मतदारांना भोगावे लागले तर आहेतच, शिवाय त्याचा परिणाम देखील मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे. - बाळकृष्ण पूर्णेकर,काँग्रेस, प्रदेश सचिव मतदानावर परिणाम : निवडणूक अधिकाऱ्यांना याद्या वेळोवेळी बदलेल्या आहेत. यांद्याचा अनुक्रमांकदेखील वारंवार बदलण्यात आला आहे. त्यामुळे मोठा घोळ झाला असून, मतदार केंद्रावर गेल्यावर लोकांना समजत नाही, नेमके कुठे जायचे, यादीत नाव एका ठिकाणी मतदान केंद्र दुसऱ्या ठिकाणी असाच काहीसा प्रकार संपूर्ण शहरभर जाणवत होता. यामुळे मतदानावर त्याचा परिणाम झाला हे मात्र नक्की. - मंदार केणी, राष्ट्रवादी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी ‘शिवसेनेलाच बहुमत’सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ठाण्याच्या सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून वचननामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे यावेळी शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा ७५ जागांवर विजय निश्चित आहे. - एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुखघोळाची जबाबदारी कुणाची?याद्यांमध्ये झालेल्या घोळाची जबाबदारी कोण घेणार? माझ्या घराचा पत्ता घंटाळीत, घंटाळीतील लोकांचे पत्ते नौपाड्यात याची जबाबदारी कोण घेणार? विशेष म्हणजे एकाच घरातील पाच जणांची नावे वेगवेगळ्या इमारतीत आढळत आहेत. याची जबाबदारी ज्यांनी या मतदारयाद्या तयार केल्या त्यांना घ्यावी लागणार आहे. तर ठाणे महानगर पालिकेत कोणाचे बहुमत नसेल, मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार. - जितेंद्र आव्हाड, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस‘यावेळी चमत्कार ’ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी ठाणेकर पाठीशी आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जास्त आहे. त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना होईल. भाजप फार मोठा आकडा गाठणार आहे. यावेळेला ठाण्यात बदल झाल्याचे दिसेल. ठाणे विधासभेच्या वेळेला जो चमत्कार झाला, तसाच महापालिकेच्या निवडणुकीत दिसेल. - संजय केळकर, आमदार, भारतीय जनता पार्टी
‘यादीकल्लोळा’ने मतदारांना मनस्ताप
By admin | Published: February 22, 2017 6:38 AM