अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त पतंजली योग समिती, डहाणू या योग वर्गातील ११ महिलांनी १५१ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम नोंदवला असून त्यांची नोंद लिम्का बुकात झाली आहे. हा कार्यक्रम मुंबईतील अंधेरी येथे पार पडला.
या कार्यक्रमात एकूण ७९३ महिला - पुरुषांनी सहभाग घेऊन ६५ मिनिटात १५१ सूर्यनमस्कार पूर्ण केले. त्यानंतर त्याची नोंद लिम्का बुक या संस्थेने घेतली. यावेळी सहभागी सदस्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. डहाणूतील महिलांसाठी पतंजलीच्या योग शिक्षिका पूजा चौधरी, दर्शना वोरा यांनी खास परिश्रम घेतले. नोकरी न करणाऱ्या या महिलांना घरकाम सांभाळून समाजात वावरणे किंवा बाहेर पडणे या गोष्टी अनेकदा शक्य होत नाहीत. परंतु, योग साधनेतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना लिम्का बुकात नोंद झाल्याने खास कुतूहल वाटत आहे. डहाणूत विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठीही ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा कार्यक्रमातून समाजामध्ये योग व व्यायामाची आवड निर्माण होऊन निरोगी आयुष्य जगण्याचे साधन असे महत्त्व योगाला प्राप्त होईल, असे मत पतंजली योग समिती डहाणूचे जिल्हा प्रभारी उत्तम सहाणे यांनी व्यक्त केले.लिम्का बुकात नोंद झालेल्या डहाणूतील महिलाया सर्व १५ महिला ३६ ते ६० वर्षे या वयोगटातील असूनही त्यांनी हे अवघड कार्य पूर्ण केले.पूजा चौधरी, दर्शना वोरा, मनीषा राणे, रत्नमाला कोळी, अर्चना ओक, आशा मोरे, सविता खडांगळे, लिना चौधरी, माधुरी पाटील, चंद्रिका तांडेल, निशा बनिया अशी त्यांची नावे आहेत.