लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘येऊ घातले भेटीला, जणू कवितांचे गावं! त्यांचा वाचानानुभवं, ऐकायला जमू सारे!! शब्दयात्रामध्ये सामिल होण्यासाठी इंद्रधनुने रसिकांना जणू काही अशीच साद घातली आणि त्याला प्रतिसाद देऊन श्रोत्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात चांगलीच गर्दी केली होती. अरुण म्हात्रे आणि अशोक बागवे या दोन कवींचे वाचनानुभव ऐकायला आलेल्या रसिकांनी मंत्रमुग्ध होण्याचा शब्दश: अनुभव घेतला.‘रंग माझा वेगळा’ या संग्रहाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे. पुलस्पर्श झालेली कविता असे जेव्हा विवेचन येते तेव्हा कौतुकाने डोळे भारले जातात. प्रस्तावना नसून ते निरूपणच असते. त्यातून पुलं पुन्हा आपल्याला भेटतात. असे रंग भरले होते कवी म्हात्रे यांनी. गोव्याच्या कवयित्री ‘डॉ. अनुजा जोशी’ यांच्या ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातून त्यांची रसिकांना ओळख करून दिली. ‘यथेच्छ’ आणि ‘आई, आजीवर रागवू नकोस गं’ या दोन कवितांचे वाचन करून डॉ. जोशींच्या प्रतिभेचा मर्मग्राही परिचय करून दिला. म्हात्रे यांच्या पोतडीतून पुढले निघालेले पुस्तक पाहून मात्र रसिक चकितच झाले. कल्पनांचा लंबक झुलतो तो फक्त कविंचाच नव्हे तर रहस्यकथा लिहिणाऱ्याचाही आणि वाचकाला वर्षानुवर्ष मोहिनी घालून ठेवतो. सतीश भावसार यांनी संकलित केलेले ‘बाबुराव अर्नाळकर’ त्यांनी रसिकांच्या भेटीस आणले होते. दाजी पणशीकर यांनी लिहीलेल्या ‘महाभारत एक सूडाचा प्रवास’ या पुस्तकाचे निरु पण सादर केले कवी अशोक बागवे यांनी. सत्यवतीने आपल्या वंशाला राज्य मिळावे यासाठी नकळत सुरु केले हे सूडसत्र शेवटी अगदी कृष्णाचा आणि पांडवांचा संहार करूनच थांबले. त्यातल्या विविध प्रसंगातली नाट्यमयता आणि सूडाभोवती फिरत असलेले हे जीवनचक्र , याचे बागवे यांनी अप्रतिम विवेचन केले. असुया या भावनेचे, सूड या कृतीत जेव्हा रु पांतर होते तेव्हाच महाभारत घडते असे या पुस्तकाचे सार त्यांनी श्रोत्यांच्या मनावर बिंबवले. कार्यक्र माच्या शेवटी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर म्हात्रे यांनी ‘उंच माझा झोका’ हे स्वरचित मालिका शीर्षकगीत गायले. आम्हाला कविता आणि कविता याविषयीच बोलायला आमंत्रण मिळते. पण इथे मात्र आम्ही काय वाचतो या विषयावर बोलायला मिळाले याचा विशेष आनंद झाला असून पुन्हा या व्यासपीठावर येऊन असाच वाचकांशी संवाद साधण्याची इच्छा बागवे आणि म्हात्रे यांनी व्यक्त केली.
कवींचे वाचनानुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध
By admin | Published: May 11, 2017 1:55 AM