ठाणे : लॉकडाऊनमुळे ग्रंथालये बंद असल्याने ग्रंथप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. यातच सुप्रसिद्ध कवी, व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी सोशल मीडियावर साद घातली आहे. यात त्यांनी ग्रंथव्यवहार हाही जीवनावश्यक मानायला हवा ! अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला ग्रंथप्रेमींनी प्रचंड संख्येने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दवणे यांनी यात अनेक प्रश्न उपस्थित करून या संकट काळात, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी ग्रंथांचे आदान प्रदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. व ग्रंथालय सेवक, त्यांचे करार पद्धतीने होणारे पगार थकल्याने होणारे हाल यावरही स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.
जीवनावश्यक सुविधांमध्ये ग्रंथवितरण व पुस्तकांची दुकाने निदान आठवड्यातून चार दिवस, सकाळी ११ ते ५ या वेळेत सुरू ठेवावीत असे सांगून यथायोग्य ग्रंथ खरेदी हे क्षणसुद्धा आजच्या स्थितीत जीवनेच्छा प्रबळ करणारे ठरू शकतात, असे म्हटले आहे. दोन वर्षे अगदी कंबरडे मोडून ठप्प व दुकानबंद झालेला हा ग्रंथ विक्री व प्रकाशन व्यवहार थोडा हलेल व नियम पाळून खरेदी करणाऱ्या वाचकांना थोडा विरंगुळा तर मिळेल. आपल्याकडे झुंड करू न शकणाऱ्या, संयमी गरजवंताकडे नेहमीच दुर्लक्ष करणे शास्त्यांना सोयीचे पडते. अगदी अन्न, पाणी, प्राणवायू इतकी टोकाची निकड नसेल. पण मनाला उभारी व ऊर्जा देण्यात पुस्तके ही मनाचा आधार व सोबत देणारे जिवलग ठरतात. आजच्या दडपणाच्या मन एकाकी करणाऱ्या वातावरणात पुस्तक वाचणे, विकत घेणे हाही आश्वासक झरोका ठरू शकेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.