ठाणे : लेखक आणि कवींनी कुठल्याही काळात सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या बाजूने असले पाहिजे. सत्याचे लेखन हाच त्यांचा धर्म, तीच त्यांची जात असली पाहिजे. आत्मविस्थापनाच्या सद्ध्याच्या दुर्दैवी काळात तर लिहिणाऱ्या हातांनी निर्भयपणे लिहीत रहायला हवे. स्वतःला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारत रहायला हवेत असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनाचे दुसरे पुष्प कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्काराच्या वितरणाने गुंफले गेले. शनिवारी वा. अ. रेगे सभागृहात खोत यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले. सत्तेचे ढोंग फाडण्याचे काम च्हित्यिक करत असतो. कोणताही साहित्यिक हा लोकशाही वादी असतो त्यात जास्त लोकशाही वादी हा कादंबरीकार असतो कारण तो अल्पमतवादी असतो. तो एकट्या माणसाचे सत्य घेऊन लढत असतो. लिहीणारा माणूस हा नेहमी शेवटच्या हबाकावर बसलेलेा असतो. सामान्यांचा आवाज पोहोचवण्याची ताकद लेखकात असते. राजाला लेखकाची भिती वाटत असते. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व लेखक, कवीने करावे तेव्हाच सामान्य माणसांचा चेहरा वाचता येतो. लेखकाने सभ्यतेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. जेत्यांचा इतिहास लिहीताना पराजितांच्या इतिहासाकडे देखील बाकराने पहावे. मानवता, करुणा याकडे देखील लेखकाचे लक्ष हवे. धर्म म्हणजेच सत्य यापलिकडे काही नाही अशी त्याची भूमिका असावी. धर्म हा उंबराच्या आत आणि उंबराच्या बाहेर आल्यावरमानवतेचा, भूतदयेचा धर्म लेखकाने पाळावा. मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे यावर लेखकाचा विश्वास असला पाहिजे.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे प्र.संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, २०२४ पासून ज्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात त्या साहित्यकृतींचा समावेश शासनाच्या ग्रंथालयात केला जाणार आहे. शासकीय ग्रंथालये देखील आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत. ४७ लाख शासनमान्य ग्रंथ शासनाकडे असून त्यापैकी ३० लाख ग्रथांची नोंदणी ई प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, १०० हून अधिक वर्षे झालेल्या पुस्तकांचे शासनाच्या माध्यमातून डिजीटायझेशन करुन ती पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ललित गटात वैभव साटम लिखीत भावकी अन गावकी तर ललितेतर गटात रुपाली मोकाशी लिखीत श्रीस्थानकाचे शीलेहार यांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय साहित्य पुरक्साराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डावीकडून ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, दा.कृ. सोमण, ठाणेकर, गाडेकर, खोत, विश्वस्त मकरंद रेगे, हेमंत काणे आणि विनायक गोखले आदी उपस्थित होते. वृंदा दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.