कल्याण : पूर्वेतील गवळी नगर भागात एका घरात नळातून मंगळवारी चक्क जिवंत साप बाहेर पडल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. यासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गवळी नगर परिसरातील गुलमोहर सोसायटी या चाळीतील एका घरात हात-पाय धुण्यासाठी नळ चालू केला असता त्यातून वळवळणारा जिवंत साप बादलीत पडला. हे पाहून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर इतर रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. बादलीतील साप पाहिल्यानंतर इतर रहिवासीही घाबरले.
अखेर काही तरुणांनी सापाला पकडून सुखरूप निर्जनस्थळी सोडून दिले. त्यातील काही दक्ष तरुणांनी पुरावा म्हणून या सापाची व्हिडीओ क्लिप काढून सोशल मीडियावर व्हायरल केली. गवळीनगर परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या नादुरूस्त आहेत. तसेच काही जुन्या झाल्याने त्या बहुतांश गळक्या आहेत. मात्र त्यांची कुणीही दुरुस्ती करत नाही. बहुदा या मार्गेच साप नळापर्यंत पोहोचला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)