- सदानंद नाईक
उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्यावर दगड खडी टाकण्यात येत आहे. दगड खडीवरून दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने, त्यांच्या जीवितास पालिका जबाबदार असल्याची टीका होत आहे.
उल्हासनगरातील डांबरीकरण रस्त्यासह सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून महापालिका बांधकाम विभाग खड्ड्यात दगडखडी टाकत आहे. मात्र टाकलेल्या दगडखडीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. दगड खडीवरून दुचाकीसह मोठ्या वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघातात जिवीतहानी झाल्यास त्याला महापालिका जबाबदार राहणार असल्याचे मत समाजसेवक प्रशांत चंदनशिवे व प्रवीण कारीरा यांनी व्यक्त करून तसे लेखी निवेदन महापालिकेला दिले. कुर्ला कॅम्प काली माता चौका समोरील संपूर्ण रस्त्यावर दगड खडी टाकण्यात आली. दगड खडीवरून अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याचे चंदनशिवे यांचे म्हणणे आहे.
महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व शहर अभियंता महेश शितलानी यांनी पाऊस सुरू असल्याने, रस्त्यातील खड्डे व दुरावस्था झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करता येत नाही. तसेच तात्पुरत्या काळासाठी खड्डे पडलेल्या रस्त्यात खडी टाकण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाने उसंत दिलीतर, रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू करण्यात येणार असून त्यासाठी साडे सहा कोटीच्या निधीची तरतूद केल्याचेही ते म्हणाले. व्हीनस चौक ते मोर्यानगरी रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता, खेमानी रस्ता, मोर्यांनगरी माणेरेगाव रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता, जुना बस स्टॉप रस्ता, कल्याण ते बदलापूर रस्ता यांच्यासह शहर अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली. रिक्षा संघटना, वाहन चालक, राजकीय नेते, नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थे साठी महापालिकेला जबाबदार धरले आहे.
रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर...उपायुक्त नाईकवाडे शहरातील बहुतांश डांबरीकरणाचे रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणाने ते भरण्यात आले नाही. पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास त्वरित रस्त्याचे डांबरीकरण व खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभाग युद्धपातळीवर सुरू करण्याची प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.