मुंबई : प्रियकराने लग्नास नकार दिला म्हणून नायगाव येथील मंजू वसंत गायकवाड (२२) या महिला पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई असलेली मंजूची मोठी बहीण प्रमिला यादव यांनी बुधवारी सकाळी मुकेश बोरगे (२२) याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी मंजूचा प्रियकर मुकेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुकेशचे वडील पोलीस हवालदार आहेत.नायगाव पोलीस वसाहतीत राहत असलेल्या मंजूचे गेल्या चार वर्षांपासून मुकेश बोरगे (२२) सोबत प्रेमसंबंध होते. तोदेखील नायगाव पोलीस वसाहतीतच कुटुंबासह राहतो. मुकेश बेरोजगार असून त्याचे वडील पोलीस हवालदार आहेत. मंजूच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रेमविवाहास परवानगी दिली होती. मात्र मुकेश लग्नासाठी टाळाटाळ करत होता. मंगळवारी दोघांमध्ये लग्नावरूनच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच मंजूने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी मुकेशविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.