ठाणे : नौपाडा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा या प्रभाग समिती मिळविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचे लॉबिंग सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सोमवारी झालेल्या महासभेत करण्यात आला. विशेष म्हणजे या समित्यांसाठी वाट्टेल ती रक्कम मोजण्याची त्यांची तयारीदेखील असल्याची माहिती समोर आली. परंतु, इतर प्रभाग समित्यांमध्ये जाण्यास कोणीही तयार का होत नाही, असा सवालही यावेळी करण्यात आला. सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यानंतरच कारवाई का केली जाते, असा प्रश्न करून ज्या ठिकाणी फायदा आहे अशा प्रभाग समित्यांमध्ये राहण्याचा सहाय्यक आयुक्तांचा हट्ट असल्याचा आरोप यावेळी झाला.
सोमवारी झालेल्या महासभेत फेरीवाल्यांच्या विरोधात सुमारे १० तास चर्चा झाली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांबरोबरच अनधिकृत बांधकामावरदेखील चर्चा केल्यानंतर महापौरांनी सहाय्यक आयुक्तांच्या कारभारावर टीका केली. कळवा, मुंब्रा, दिवा, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समितीच्या हद्दीत झालेल्या आणि होत असलेल्या बांधकामांवरून मध्यंतरी ठाणे महापालिकेने टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्यानंतर आपल्या पूर्वीच्या प्रभाग समितीमध्ये कारवाई न करता प्रभाग समितीत बदली झाल्यानंतर मात्र सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई केली जात असल्याचे महापौरांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बदलीनंतरच जर कारवाई होणार असेल तर, आधीच्या प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांचे काही लागेबांधे आहेत का असा प्रश्नदेखील उपस्थित केला.
आवडीची प्रभाग समिती मिळण्यासाठी ठाणे महापालिकेत वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. कोणाला कोणती प्रभाग समिती द्यायची, अतिक्रमण विभागात कोणाला किती वर्षे ठेवायचे यासाठीही ती केली जात असून, हा सर्व प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.