स्विकृतच्या एका जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्टÑवादीच्या श्रेष्ठींचे लॉबींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:29 PM2018-07-19T17:29:22+5:302018-07-19T17:31:44+5:30
मागच्या दरवाज्याने पालिकेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी लॉबींग सुरु केले आहे. प्रशासनाने तुर्तास कॉंग्रेसच्या बाजूने झुकते माप दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शुक्रवारच्या महासभेत कोणती भुमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे - स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असतांनाच आता सदस्य निवडीचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एका सदस्य निवडीसाठी राष्ट्रवादीकडून थेट पक्ष प्रमुख शरद पवार यांनी आणि कॉंग्रेसकडून प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लॉबींग सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही प्रशासनाने कॉंग्रेसला शब्द दिल्याने राष्ट्रवादी महासभेच्या दिवशी काय भुमिका घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शुक्रवारी महासभेत स्विकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु या निवडीबाबत किबंहुना राष्ट्रवादीचे तौलानिक संख्याबळ अधिक असतांनासुध्दा पालिका प्रशासनाने कॉंग्रेसच्या सदस्याची स्विकृतपदासाठी वर्णी लावण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यातही प्रशासन कॉंग्रेसच्या सदस्य निवडीबाबत ठाम असल्याने राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोहर साळवी यांच्या नावावर सर्वांनीच ठाम भुमिका घेतली असून वेळ पडल्यास सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भुमिकासुध्दा घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. दरम्यान, मनोहर साळवी यांचे शरद पवार यांच्याशी जुने संबध असल्याने खुद्द पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना फोन करुन साळवी यांच्या नावाची शिफारश केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या वतीने मनोज शिंदे यांच्या नावासाठी थेट प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. त्यात राष्ट्रवादीला मिळालेल्या माहिती नुसार प्रशासन कॉंग्रेसच्या सदस्याची निवड करण्यावर ठाम आहे. त्यामुळेच आम्ही आक्रमक भुमिका घेतली असल्याची माहिती शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतली.
एकूणच मागील दारातून प्रवेश मिळविण्यासाठी प्रथमच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीच लॉबींग केल्याने यात कोणाची सरशी होणार हे आता शुक्रवारच्या महासभेतच स्पष्ट होणार आहे.